नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -शासनाच्या अल्पसंख्यांक विभागामार्फत मदरसांचे आधुनिकीकरण करण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने २०२३-२४ या वर्षासाठी जिल्ह्यातील मदरसांनी १५ जानेवारी २०२४ पर्यंत आपले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
या योजनेंतर्गत शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या अनुदानातून पात्र मदरसांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांक विकास विभागाचे २६ डिसेंबर, २०२३ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये सन २०२३-२४ वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसांना प्रस्ताव सादर करण्यास १५ जानेवारी, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्हास्तरावर या योजनेसाठी शिफारस करण्याकरिता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनास प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख २५ जानेवारी, २०२४ असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी कळविले आहे.