पाटणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची निवड करण्यात आली आहे. आज दिल्लीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष लालन सिंह यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन त्यांनीच नितीशकुमार यांच्या नावाची शिफारस केली.
याआधी नितीश कुमार यांनी जॉर्ज फर्नांडिसपासून शरद यादव, आरसीपी सिंह, उपेंद्र कुशवाह आणि प्रशांत किशोरपर्यंत सर्वांना पक्षाच्या मोठ्या पदांवरून हटवले आहे. या वेळी नितीशकुमार पक्षाची कमान कोणाकडे देणार याकडे लक्ष लागले असतांना त्यांनीच ती स्वत.कडे घेतली. एकेकाळी नितीशकुमारांचे सेनापती असलेल्या आरसीपी सिंग यांनी पक्षाचे पद सोडल्यानंतर नितीश यांच्याविरोधात बंडखोरी केली होती. त्यामुळे यावेळेस ती काळजी घेण्यात आली.
बिहारसह काही राज्यांमध्ये विरोधकांच्या जागा लवकरात लवकर वाटून घेण्याचा नितीशकुमारांचा प्रयत्न आहे. नितीशकुमारांना ‘इंडिया’ आघाडीचा चेहरा न केल्याचा राग त्यांच्या मनात आहे. पण, ते उघड त्याबाबत बोलत नाही. पण, आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानाच्या घोषणा देत त्यांचे समर्थन केले आहे. लालन सिंह यांनी मला लोकसभा निवडणूक लढवायची असल्यामुळे दोन्ही जबाबदा-या सांभाळणे अवघड असल्यामुळे राजीनामा दिल्याचे सांगितले.
या सर्व घडामोडीवर आरएलजेडी अध्यक्ष उपेंद्र कुशवाह म्हणाले की, एनडीएशी फारकत घेतल्यानंतर JD(U) ने जो मार्ग स्वीकारला आहे, तो त्याच्या शेवटाकडे नेईल, असे मी आधीच सांगितले होते. लालनसिंग हे JD(U) पेक्षा RJD नेते वाटतात हे काही काळापासून दिसून येत होते. नितीश कुमार यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु गोष्टी कधीच सारख्या होणार नाहीत.