इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा डावखुरा फिरकीपटू व अष्टपैलु खेळाडू, भरवशाचा नामवंत रणजीपटू सत्यजित बच्छाव या वर्षी देखील महाराष्ट्र संघातर्फे सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी -T-20 – स्पर्धेकरिता निवडण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे टी-ट्वेंटी सामन्यांची स्पर्धा – सय्यद मुश्ताक अली चषक आयोजित करण्यात येते.
२०१८-१९ ह्या वर्षी या स्पर्धेत सत्यजित बच्छाव सर्वाधिक बळी मिळवत महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत नेण्यासाठी मोठा हातभार लावला होता व महाराष्ट्राने या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सत्यजित हा महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधवच्या नेतृत्वा खाली महाराष्ट्र संघात सत्यजितची निवड झाली आहे. या स्पर्धेतूनच आयपीएल स्पर्धेत खेळण्याची संधी उपलब्ध होते.
मागील सहा-सात वर्षांपासून मुश्ताक अली स्पर्धेत सत्यजित सातत्याने उत्कृष्ठ कामगिरी करत असल्यानेच गेली काही वर्षे आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत त्याचा समावेश होत आहे. आयपीएल लिलावात २० लाख इतकी कमीतकमी बोली किंमत मिळणार्या खेळाडुंच्या, आतापर्यंत प्रतिनिधित्व न केलेल्या गटात त्याचा समावेश होता. त्याबरोबरच आयपीएल २०२२ च्या हंगामासाठी महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स – सी एस के – तर्फे संघाच्या शिबिरासाठी निवड झाली होती. सत्यजितला चेन्नई सुपर किंग्सने गोलंदाजी विशेषज्ञ म्हणुन संघाच्या शिबिरात खास निमंत्रित केले होते.
गेल्या २०२२ च्या हंगामात मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेच्या काही सामन्यांत सत्यजितने महाराष्ट्राचे कर्णधारपद देखील भूषवले होते. जानेवारी २०१६ तील सर्विसेस विरुद्ध कटक येथे सुरू झालेल्या ,आतापर्यंतच्या टी-ट्वेंटी च्या कारकिर्दीत सत्यजितने ४६ सामन्यातील ४५ डावात एकूण ६२ बळी घेतले असून १८ धावात ४ बळी हि त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
मागच्या २०२२-२३ च्या हंगामात सत्यजितच्या नेतृत्वात त्याच्या अष्टपैलु खेळामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत ( एम सी ए सिनियर इन्विटेशन लीग ), नाशिकने विजेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात अप्रतिम कर्णधाराची खेळी करत सत्यजित बच्छाव दमदार १५२ धावांवर नाबाद राहीला. यापूर्वी २०१४ मध्ये हि स्पर्धा नाशिकने ४३ वर्षांनंतर जिंकली होती. त्यानंतर पुन्हा ९ वर्षांनी नाशिकच्या क्रिकेटपटुंनी अशी दैदीप्यमान कामगिरी केली. अव्वल साखळीत – सुपर लीग – सामन्यांत नाशिकने तीन निर्णायक विजय मिळवले होते . त्या तुलनेत अंतिम फेरीतील डी व्ही सी ए ला दोनच निर्णायक विजय मिळाले होते . म्हणून अंतिम फेरी अनिर्णित राहिल्यांतरहि नाशिक अजिंक्य ठरले. नाशिक जिल्हा संघाने साखळी व अव्वल साखळीत – लीग व सुपर लीग – सामन्यांत जोरदार कामगिरी करत स्पर्धेत सहभागी महराष्ट्राचे २१ जिल्हे व २७ नामवंत क्लबज् अशा एकूण ४८ संघांमध्ये सर्वाधिक गुण मिळवत प्रथम स्थान पटकवले होते. कर्णधार सत्यजित बच्छावने स्पर्धेत उत्कृष्ट नेतृत्वाबरोबरच अष्टपैलू चमक दाखवत फलंदाजीत २ शतके व ४ अर्धशतके झळकवत १० डावात ५४७ धावा केल्या तर गोलंदाजीत १० सामन्यातील १६ डावात ४९ बळी घेतले व अर्थातच अंतिम लढतीत नाबाद १५२ धावांची अविस्मरणीय खेळी केली.
सत्यजितच्या महाराष्ट्र संघातील या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्यजितचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सय्यद मुश्ताक अली T-20 – स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा चमु :
केदार जाधव – कर्णधार, ऋतुराज गायकवाड, सत्यजित बच्छाव, अरशीन कुलकर्णी, अजीम काझी, सिद्धार्थ म्हात्रे, अंकित बावणे, मंदार भंडारी – यष्टिरक्षक धनराज शिंदे, प्रशांत सोळकी, विकी ओस्तवाल, प्रदीप दाढे, राजवर्धन हंगर्गेकर, विजय पावले, निखिल नाईक व ऋषभ राठोड.
असे आहे सामने
१६ ऑक्टोबरला मोहाली येथे महाराष्ट्राचा पहिला सामना बंगाल बरोबर होत असून , महाराष्ट्राचे बाकी सामने पुढीलप्रमाणे होणार आहेत :
१७ ऑक्टोबर – उत्तराखंड , २१ ऑक्टोबर – पुदुचेरी, २३ ऑक्टोबर – झारखंड , २५ ऑक्टोबर – विदर्भ , २७ ऑक्टोबर – राजस्थान .