मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक येथे गुरुवारी रात्री प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी भेट घेतली. या भेटीमागील कारण स्पष्ट झाले नसले तरी पवार व अदानी यांच्या वारंवार भेटीमुळे इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहे. या भेटीच्या वेळी खासदार सुप्रिया सुळे या सुध्दा उपस्थित होत्या.
काही दिवसापूर्वी उध्दव ठाकरे यांनी अदानी यांच्या विरोधात धारावी प्रकल्पाच्या संदर्भात मोर्चा काढला होता. त्यानंतर ही भेट होत आहे. अदानी यांच्यावर काँग्रेस नेहमी टीका करत असते. त्यांच्या भाजपशी असलेल्या संबधावरही प्रहार करते त्यानंतर या भेटी शरद पवार घेत असल्यामुळे त्यामागे नेमकं दडलं काय असा प्रश्न नेहमी चर्चेत असतो. पण, या भेटीचा तपशील नेहमीच गुलदस्त्यात असतो.
शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांची जुनी मैत्री आहे. या दोघांच्या वारंवार भेटीमुळे मात्र ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. राष्ट्रवादीतील बंडानंतर भेट झाली होती. त्यानंतर गुजराथला एका कार्यक्रमानिमित्त दोघे एकत्र होते. आता या वारंवार भेटीचा राजकीय अर्थ काढण्यात येत असून नेमका या दोघांमध्ये काय चर्चा झाली असावी, याबाबत आडाखे बांधण्यात येत आहेत.
गौतम अदानी जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहते तसेच ते शरद पवार यांनादेखील मानतात. काही महिन्यांपूर्वी हिंडेबर्गचा खळबळजनक अहवाल आला होता तेव्हा पवार यांनी अदानी यांचा बचाव केला होता. एकीकडे संसदेत विरोधी पक्ष अदानींच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडत होते तेव्हा दुसरीकडे पवार यांनी अदानी यांच्यावर टीका करणे टाळले होते.