नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येला भेट देणार आहेत. सकाळी सुमारे ११.१५ वाजता पंतप्रधान पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील आणि नवीन अमृत भारत गाड्या आणि वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. इतर अनेक रेल्वे प्रकल्पही ते देशाला समर्पित करतील. सुमारे १२.१५ वाजता पंतप्रधान नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन करतील. पंतप्रधान, दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. तिथे ते १५,७०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या राज्यातील अनेक विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. यामध्ये अयोध्या आणि तिच्या आसपासच्या भागांच्या विकासासाठी सुमारे ११,१०० कोटी रुपयांचे प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील इतर प्रकल्पांशी संबंधित सुमारे ४६०० कोटी रुपयांचे प्रकल्प यांचा समावेश आहे. अयोध्येत आधुनिक जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे, संपर्क व्यवस्था सुधारणे आणि शहराच्या समृद्ध इतिहास तसेच वारशाच्या अनुषंगाने नागरी सुविधांमध्ये सुधारणा करणे ही पंतप्रधानांची ध्येयदृष्टी आहे. या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी शहरात नवीन विमानतळ, नवीन पुनर्विकसित रेल्वे स्थानक, नवीन नागरी रस्ते आणि इतर नागरी पायाभूत सुविधांचा शुभारंभ होत आहे. यासह, अनेक नवीन प्रकल्पांची पायाभरणी केली जाईल, त्यामुळे अयोध्या आणि आसपासच्या नागरी सुविधांचे सुशोभीकरण आणि सुधारणेला हातभार लागेल.
अयोध्या विमानतळ
अयोध्येतील अत्याधुनिक विमानतळाचा पहिला टप्पा 1450 कोटी रुपयांहून अधिक खर्चून विकसित केला आहे. विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर असेल. दरवर्षी सुमारे 10 लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी ते सुसज्ज असेल. टर्मिनल इमारतीच्या दर्शनी भागामध्ये अयोध्येतील उद्घाटन होऊ घातलेल्या श्रीराम मंदिराच्या स्थापत्यकलेचे चित्रण केले आहे. टर्मिनल इमारतीचा अंतर्गत भाग भगवान श्रीराम यांचे जीवन दर्शवणारी स्थानिक कला, चित्रे आणि भित्तीचित्रांनी सुशोभित केला आहे.
अयोध्या विमानतळाची टर्मिनल इमारत उष्णतारोधक छत प्रणाली, एलईडी दिवे, पावसाचे पाणी साठवणे, कारंज्यांसह मोहक हिरवळ, जलशुद्धीकरण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प यासारख्या विविध शाश्वत वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. अशा इतर अनेक वैशिष्ट्यांसह ‘गृह चार’ जीआरआयएचए- चार मानांकनाची पूर्तता ही विमानतळ वास्तू करते. या विमानतळामुळे या भागातील दळणवळण सुधारेल. परिणामी पर्यटन, व्यावसायिक उपक्रम आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल.
अयोध्या धाम रेल्वे स्थानक
अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचा पहिला टप्पा 240 कोटी रुपयांहून अधिक खर्चून विकसित करण्यात आला आहे. तीन मजली आधुनिक रेल्वे स्थानकाची इमारत उद्वाहक, सरकते जिने, खाद्य पदार्थ, भोजन, उपाहारगृह परिसर, पूजा साहित्याची दुकाने, कपडे ठेवण्यासाठीच्या खोल्या, बालसंगोपनासाठी कक्ष , प्रतीक्षालय यासारख्या सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. स्थानकाची इमारत ‘सर्वांसाठी खुली’ आणि ‘आय. जी. बी. सी. प्रमाणित हरित स्थानक इमारत’ असेल.
अमृत भारत रेल्वे, वंदे भारत रेल्वे आणि इतर रेल्वे प्रकल्प
अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमात देशातील अतिजलद प्रवासी गाड्यांच्या नवीन श्रेणी-अमृत भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील.अमृत भारत रेल्वे गाडी ही एलएचबी पुश – पुल ट्रेन म्हणजे दोन्ही बाजूने खेचता येण्यासारखी गाडी असून तिचे डबे वातानुकूलित नाहीत. चांगल्या वेगासाठी या गाडीच्या दोन्ही टोकांना लोको इंजिन आहेत. या गाडीत प्रवाशांसाठी सुंदर आणि आकर्षक रचना केलेली आसन व्यवस्था, सामान ठेवण्यासाठी उत्तम कप्पे, मोबाईल अडकवण्याच्या सोईसह मोबाईल चार्जिंग पॉइंट, एलईडी दिवे, सीसीटीव्ही, सार्वजनिक माहिती प्रणाली यासारख्या चांगल्या सुविधा आहेत.पंतप्रधान, सहा नवीन वंदे भारत रेल्वेगाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवतील. दरभंगा-अयोध्या-आनंद विहार टर्मिनल अमृत भारत एक्सप्रेस आणि मालदा शहर-सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस (बंगळुरू) अमृत भारत एक्सप्रेस या दोन नवीन अमृत भारत गाड्यांनाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील.पंतप्रधान सहा नवीन वंदे भारत गाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवतील. यामध्ये, श्री माता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, अमृतसर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस; कोईम्बतूर-बंगळुरुर कॅन्ट वंदे भारत एक्सप्रेस, मंगळूरु-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि अयोध्या-आनंद विहार टर्मिनल वंदे भारत एक्सप्रेस, या गाड्यांचा समावेश आहे.या प्रदेशातील रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी 2300 कोटी रुपयांचे तीन रेल्वे प्रकल्पही पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील. रुमा चकेरी-चंदेरी, जौनपूर-अयोध्या-बाराबंकी दुहेरीकरण प्रकल्पातील जौनपूर-तुलसीनगर, अकबरपूर-अयोध्या, सोहवाल-पतरंगा आणि सफदरगंज-रसौली विभाग, आणि मल्हार-दळीगंज रेल्वे विभागाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण प्रकल्प, असे हे तीन प्रकल्प आहेत.
अयोध्येतील सुधारीत नागरी पायाभूत सुविधा
निर्माणाधीन श्रीराम मंदिराकडे जाणे सोपे व्हावे यासाठी, पंतप्रधान अयोध्येतील, रामपथ, भक्तिपथ, धर्मपथ आणि श्रीरामजन्मभूमी पथ या चार नव्याने पुनर्विकसित, रुंदीकरण केलेल्या आणि सुशोभित रस्त्यांचे उद्घाटन करतील.नागरी पायाभूत सुविधांना बळकटी देणारे आणि अयोध्येतील आणि आसपासच्या सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण करणाऱ्या अनेक प्रकल्पांचे पंतप्रधान उद्घाटन करतील आणि हे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. या प्रकल्पांमध्ये, राजर्षी दशरथ स्वायत्त राज्य वैद्यकीय महाविद्यालय, अयोध्या-सुलतानपूर रोड-विमानतळ यांना जोडणारा चौपदरी रस्ता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 27 बायपास महोब्रा बाजार मार्गे तेढी बाजार श्रीरामजन्मभूमीपर्यंत चौपदरी रस्ता; शहर आणि अयोध्या बायपास परिसरातील अनेक सुशोभित रस्ते, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-330A चा जगदीशपूर-फैजाबाद विभाग, महोली-बारागाव-देवधी रस्ता आणि जसरपूर-भाऊपूर-गंगारामन-सुरेशनगर रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण, पंचकोसी परिक्रमा मार्गावरील बडी बुवा रेल्वे फाटकावर रेल्वे उड्डाणपूल, पिखरौली गावात घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, आणि डॉ. ब्रजकिशोर होमिओपॅथिक महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये नवीन इमारती आणि वर्गखोल्या, अशा प्रकल्पांचा समावेश आहे. मुख्यमंत्री नगर सृजन योजनेच्या कामांशी संबंधित कामे आणि पाच वाहनतळ तसेच व्यावसायिक सुविधांचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.
अयोध्येत नवीन प्रकल्पांची पायाभरणी
अयोध्येतील नागरी सुविधांच्या सुधारणेत मदत करणाऱ्या, तसेच शहराचा समृद्ध सांस्कृतिक वारसा बळकट करणाऱ्या नवीन प्रकल्पांची पायाभरणी देखील, पंतप्रधान करतील. यामध्ये, अयोध्येतील चार ऐतिहासिक प्रवेशद्वारांचे संवर्धन आणि सुशोभीकरण, गुप्तार घाट आणि राजघाट दरम्यान नवीन काँक्रीट घाट आणि पूर्वनिर्मित घाटांचे पुनर्वसन, नया घाट ते लक्ष्मण घाटापर्यंतच्या पर्यटन सुविधांचा विकास आणि सुशोभीकरण, ‘राम की पौडी’ इथे दीपोत्सव आणि इतर जत्रांसाठी अभ्यागतांसाठी सज्जा बांधणे, राम की पौडी ते राज घाट आणि राजघाट ते राम मंदिर या यात्रेकरू मार्गाचे बळकटीकरण आणि नूतनीकरण, या प्रकल्पांचा समावेश आहे.पंतप्रधान, अयोध्येत 2180 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित केल्या जाणाऱ्या हरितक्षेत्र नगर वसाहत आणि सुमारे 300 कोटी रुपये खर्चून विकसित होणाऱ्या वसिष्ठ कुंज निवासी योजनेची पायाभरणी करणार आहेत.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-28 (नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-27) च्या लखनौ-अयोध्या विभागाची पायाभरणी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-28 (नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -27) च्या विद्यमान अयोध्या बायपासचे बळकटीकरण आणि सुधारणा, अयोध्येत CIPET केंद्राची स्थापना आणि अयोध्या महानगरपालिका, तसेच अयोध्या विकास प्राधिकरण कार्यालयाचे बांधकाम, या कामांची पायाभरणी सुद्धा पंतप्रधान करतील.
उत्तर प्रदेशातील इतर प्रकल्प
सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान उत्तर प्रदेशातील इतर महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन करुन ते राष्ट्राला समर्पित करतील. यामध्ये गोसाई की बाजार बायपास-वाराणसी (घाघरा ब्रिज-वाराणसी) (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-233) च्या चौपदरी रुंदीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-730 च्या खुटार ते लखीमपूर विभागाचे बळकटीकरण आणि सुधारणा, अमेठी जिल्ह्यातील त्रिशुंडी येथील एलपीजी प्लांटची क्षमतावाढ, पांखा येथे 30 एमएलडी आणि जाजमाऊ, कानपूर येथे 130 एमएलडीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, उन्नाव जिल्ह्यातील नाले अडवून ते वळवणे आणि त्यावर सांडपाणी प्रक्रिया आणि कानपूरमधील जाजमाऊ येथे टॅनरी क्लस्टरसाठी सीईटीपी, अशा प्रकल्पांचा समावेश आहे.