येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात पुन्हा एकदा मोकाट कुत्र्यांनी दोन अल्पवयीन मुलांचे अक्षरशः लचके तोडले. तर चावा घेतलेल्या मुलांना येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रेबीज इंजेक्शन न मिळाल्याने कुटुंबियांची मात्र धावपळ झाली. येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला इंजेक्शन पुरेशा प्रमाणात मिळत नाही का असा सवाल आता सर्व स्तरातून उपस्थित होतोय.
शहराच्या विविध भागात मोकाट कुत्र्याची संख्या प्रचंड वाढली आहे. गुरुवारी मुलतानपुरा परिसरात इरफान अन्सारी वय ३ वर्षे व आर्या अन्सारी वय १ वर्षे गल्लीत खेळत असतांना या मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केला. या मुलांना मोठी दुखापत झाली.
कुत्र्याने चावा घेतल्यानंतर शहरातील नागरिकांना तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. पण, येथील उपजिल्हा रुग्णालयात रेबीजचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप आहे.