नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिने आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी संबंधित सर्व शासकीय यंत्रणा सकारात्मक आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्री शर्मा बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ अशोक करंजकर, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अपर आयुक्त निलेश सागर, पोलिस उप आयुक्त चंद्रकांत खांडवी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नाशिक प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता उदय पालवे, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, आयमा चे अध्यक्ष निखिल पांचाळ यांच्यासह संबंधित शासकीय यंत्रणांचे अधिकारी व जिल्ह्यातील सर्व उद्योग संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचे विस्तारीकरण पाहता त्यादृष्टिने उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने उद्योजक व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी औद्योगिक क्षेत्राशी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांसोबत समन्वय ठेवावा. तसेच यापुढे उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दरमहा जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक आयोजित करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उद्योजकांना आश्वासित केले.
उद्योजकांनी उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, रस्ते, सांडपाणी, पथदिप, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सुविधा, कायदा व सुव्यवस्था, वीज पुरवठा, उद्योगा संबंधित विविध कर, उद्योगांच्या प्रदर्शनासाठी आवश्यक जागा, एटीएम सुविधा अशा विविध प्रश्नांवर याबैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर उद्योजकांनी मांडलेल्या सूचना व अडीअडचणींवर प्रशासनामार्फत सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी यावेळी सांगितले.