इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचे मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात त्यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे काँग्रेसने यावर जोरदार टीका केली आहे. शस्त्रास्त्रांचा व्यापार करणारा संजय भंडारी याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात हा उल्लेख आहे. आरोपपत्रात प्रियंकाचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या नावाचाही उल्लेख आहे.
या आरोपपत्रात पण, प्रियंका गांधी यांना आरोपी ठरवण्यात आलेले नसले तरी त्यांचा उल्लेख केल्यामुळे त्यावर काँग्रेसनेही जोरदार हल्लाबोल केला आहे. रॉबर्ट वड्रा आणि प्रियंका गांधी यांनी दिल्लीस्थित रिअल इस्टेट एजंटच्या माध्यमातून हरियाणातील जमीन खरेदी केली होती, ज्याने एनआरआय उद्योगपती सीसी थंपी यांनाही जमिनीचा एक तुकडा विकला होता, असा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे.
या प्रकरणात महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिय देतांना सांगितले की, भाजप हा एक घाबरलेला पक्ष आहे जो स्वतःला शक्तिशाली पक्ष मानतो आणि गांधी कुटुंबाला घाबरतो. केंद्रात स्वत: शक्तिशाली आहे. इंग्रजांनाही गांधींची भीती वाटत होती आणि आजचे सरकारही गांधींना घाबरते आणि म्हणूनच केंद्र सरकार अशा प्रकरणांमध्ये गांधी कुटुंबाला गुंतवून लोकांना मूळ मुद्द्यापासून वळविण्याचा कट रचत आहे.
तर काँग्रेस नेता पवन खेडा म्हणाले, ही तर सुरुवात आहे, बघा निवडणुकीपूर्वी हे लोक आणखी काय करतात? हे लोक काही करत नाहीत. पहिल्यांदा. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ते असेच कट रचतात, म्हणून त्यांना उधळू द्या.