पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सत्यजित रे यांचा ‘अशनी संकेत’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्याला ५० वर्षे झाल्या निमित्त, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ-भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय संस्था (एनएफडीसी-एनएफएआय) या चित्रपटाची 4K पुनर्संचयित आवृत्ती सर्वांसाठी प्रदर्शित करणार आहे.
हा चित्रपट गंगाचरण चक्रवर्ती (अभिनेते सौमित्र चटर्जी) आणि त्यांची तरुण पत्नी (अभिनेत्री बबिता) यांच्या दैनंदिन जीवनातून बंगालमधील दुष्काळाच्या वास्तवाचा शोध घेतो. या चित्रपटाला १९७३ मध्ये २३ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीच्या गोल्डन बेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन (NFHM) अंतर्गत, एनएफडीसी-एनएफएआय च्या अथक प्रयत्नांमुळे काही दशकांपुर्वीचे हे लोकप्रिय चित्रपट सर्वसामान्य नागरिकांना पाहता येत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला एनएफडीसी-एनएफएआय ने, “C.I.D” (१९५६), “गाइड” (१९६५), “ज्वेल थीफ” (१९६७), आणि “जॉनी मेरा नाम” (१९७०) हे चित्रपट प्रदर्शित करून देव आनंद यांची जन्म शताब्दी साजरी केली.
एनएफडीसी-एनएफएआय चे व्यवस्थापकीय संचालक प्रिथुल कुमार म्हणाले, “एनएफडीसी-एनएफएआय ने आपल्या संग्रहातील अशनी संकेत चित्रपटाच्या दोन ३५ मिमी लांबीच्या चित्र फीतींचे जतन केले आहे. उपशीर्षके असलेली आणि रंग फिका झालेली, अशा अन्य दोन चित्रफिती पुनर्संचयित करण्या योग्य नाहीत. मूळ कॅमेरा द्वारे केलेल्या चित्रीकरणाच्या निगेटिव्ह सापडत नव्हत्या. निर्मात्याच्या कुटुंबियांना देखील त्याबद्दल माहिती नव्हती. पश्चिम बंगाल सरकारच्या माहिती आणि सांस्कृतिक कार्य (I&CA) विभागाने अशनी संकेतच्या ३५ मिमी लांबीच्या प्रिंटचे उत्तम दर्जाचे जतन केले होते . सत्यजित रे यांचे इतर चित्रपट पुनर्संचयित करण्यासाठी एनएफडीसी-एनएफएआय ने पश्चिम बंगालच्या माहिती आणि सांस्कृतिक कार्य विभागाशी यापूर्वी सहयोग केला होता. आता पुन्हा एकदा या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन पुनर्संचयनाचे हे काम केले आहे. पुनर्संचयनासाठी चित्रपटाची ३५ मिमी रिलीज प्रिंट 4K रिझोल्यूशनमध्ये स्कॅन केली गेली. सत्यजित रे यांच्या चित्रपटांपैकी अशनी संकेत या चित्रपटाची चांगल्या दर्जाची चित्रफित विविध ऑनलाईन व्यासपीठांवर बहुधा उपलब्ध नाही. त्यामुळे या चित्रपटाची 4K पुनर्संचयित आवृत्ती आणखी महत्वाची ठरते.”
पुण्यामध्ये लॉ कॉलेज रोड येथील एनएफडीसी-एनएफएआयच्या, मुख्य थिएटरमध्ये शनिवार, ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता या चित्रपटाचे स्क्रिनिंग (प्रदर्शन) होणार आहे. बंगाली भाषेतील या चित्रपटाला इंग्रजी सबटायटल्स आहेत. बिगर-व्यावसायिक तत्त्वावर तो प्रदर्शित केला जाईल आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल.