नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या रसिका शिंदेने महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातर्फे खेळताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयच्या तेवीस वर्षांखालील स्पर्धेत, उपांत्यपूर्व सामन्यात हिमाचल प्रदेश विरुद्ध महत्वपूर्ण खेळी करत महाराष्ट्र संघाला उपांत्यफेरी गाठण्यात यश मिळवून दिले.
विजयासाठी ७२ धावांचा पाठलाग करताना सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन रसिका शिंदेने ५ बाद ४२ वरुन , १५ चेंडूत २ चौकारांसह नाबाद १५ धावा अशी निर्णायक खेळी करत ८ बाद ७२ या धावसंख्या गाठून, तेवीस वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाला २ गडी राखून विजयी केले. उपांत्यफेरीत महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाची लढत, दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामन्यातील विजेत्या संघाबरोबर २९ डिसेंबरला इंदोर येथे नियोजित आहे.
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी रसिका शिंदेचे खास अभिनंदन करून उपांत्यफेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.