नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या कामासंदर्भात उद्या २८ डिसेंबर रोजी सकाळी ११:३०वाजता मुंबई येथील मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीची आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पत्राच्या मागणीनुसार ही बैठक आयोजित केली आहेय
आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वासाळी येथे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून स्मारक मंजूर झाले आहे. यासंदर्भात यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ३८८ कोटी ८४ लाख रुपयांचे स्मारक उभारणे व दुसऱ्या टप्प्यात उर्वरित काम करण्यासाठी ९६ कोटी रुपये इतक्या रकमेस मंजुरी देण्याचे निश्चित झाले होते. त्याचबरोबर या स्मारकाच्या ठिकाणापासून जवळच असलेल्या कळसूबाई शिखरावर ये-जा करण्यासाठी रोप वे उभारण्याबाबत चर्चा झाली.
त्यानुसार त्याचा २११ कोटी रकमेचा स्वतंत्र डीपीआर तयार करून केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेत मंजुरीसाठी पाठविण्यात यावा, असा निर्णय यापूर्वीच्या बैठकीत झाला होता. स्मारकाच्या कामास गती मिळावी यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी वरील सर्व मुद्यांचा आपल्या पत्रात उल्लेख करत उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे सर्व आदिवासी आमदारांसह बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री पवार यांनी आदिवासी आमदारांसह ग्रामविकासमंत्री, आदिवासी विकास मंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री त्याचप्रमाणे वरील सर्व विभागांचे अधिकारी यांच्यासमवेत उद्या मंत्रालयात सकाळी ११:३० वाजता बैठक बोलावली आहे.या बैठकीमुळे स्मारकाच्या कामास गती मिळेल,असा विश्वास आमदार माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला आहे.