नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची समिती गठीत करण्यात आली आहे. या बाबतचा सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
या शासन निर्णयानुसार राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी मंत्री सुभाष देशमुख, विधानसभा सदस्य रईस शेख, अनिल बाबर यांच्यासह विधान परिषद सदस्य प्रविण दटके हे सदस्य आहेत. तर महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हे समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. तसेच समिती राज्यातील ज्या विभागात पाहणी दौरा करेल त्या विभागातील संबंधित प्रादेशिक उपआयुक्त (वस्त्रोद्योग) तेथील समन्वयक म्हणून काम पाहतील, असे ही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
अशी आहे समितीची कार्यकक्षा…
राज्यातील यंत्रमाग बहुल भागातील संघटना यांनी दिलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने त्यांच्या समस्यांचा अभ्यास करणे.
राज्यातील यंत्रमाग बहुल भागातील समस्यांबाबत यंत्रमाग धारकांच्या विविध संघटना/फेडरेशन यांच्याशी चर्चा करणे.
राज्यातील यंत्रमाग बहुल भागातील समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय योजना शासनास सादर करणे.
वस्त्रोद्योग प्रकल्पांना वीज सवलत योजनेंतर्गत यंत्रमाग धारकांना ऑनलाईन नोंदणी करणेसाठी येत असलेल्या अडचणींबाबत उपाययोजना सुचविणे.
यंत्रमाग घटकासाठी अल्पकालीन उपाययोजना सुचविणे.
राज्य शासनाच्या यंत्रमागासाठीच्या प्रचलित योजनांमध्ये काही बदल सुचवायचा असल्यास त्यानुसार बदल प्रस्तावित करणे.