नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्ली येथे १८ ते २३ डिसेम्बर, २०२३ दरम्यान ६७ व्या राष्ट्रीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १४ वर्षे गटामध्ये नाशिकच्या आयुष दळवीने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतांना सुंदर खेळाचे प्रदर्शन करून कास्य पदकाची कमाई केली.
जिम्नॅस्टिक्सच्या पॅरेलल बार या प्रकारात आयुषने प्राथमिक फेरीमध्ये चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून पहिल्या सहामध्ये आपले स्थान पक्के केले. तर अखेरच्या अटीतटीच्या सत्रात सुंदर खेळ करून कास्य पदक पटकावले. प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या आयुषने पहिल्या प्रयत्नातच राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळविले ही नाशिकच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे.
आयुष हा नाशिकच्या आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आठवीमध्ये शिकत असून त्याला गेल्या चार वर्षांपासून आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षक प्रबोधन डोणगांवकर यांचे चानशी येथे असलेल्या प्रबोधन जिम्नॅस्टिक्स सेंटर येथे नियमित मार्गदर्शन मिळत आहे.. याआधी याच सेंटरमधील रुद्र सोमवंशी, अमित कांबळे यांनी राष्ट्रीय स्पर्धेत पदके प्राप्त केलेली आहेत.
आयुष दळवी याच्या या यशाबद्दल छत्रपती पुरस्कार प्राप्त अनुराधा डोणगांवकर, नाशिक जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे अध्यक्ष शाहू खैरे, सचिव राकेश केदारे, मार्गदर्शक भास्कर कवीश्वर आदींनी आयुष दळवी आणि प्रशिक्षक प्रबोधन डोणगांवकर यांचे अभिनंदन केले.