नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालकाला नोकरांनी गंडा घातल्याच्या अनेक घटना समोर येतात. पण, यात पुरुषांचे प्रमाण जास्त असते. पण, नागपूरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात काम करणा-या पाच सेल्सगर्लने हा गंडा घातला असून तब्बल ७४ लाख २५ हजाराचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. विशेष म्हणजे ही चोरी चार वर्षात केली. तरी मालकाला ती का लक्षात आली नाही हे कोडचं आहे. आता या चोरीची तक्रार मालकाने तहसिल पोलिस स्थानकात केली असून त्यानंतर या पाचही सेल्सगर्ल विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वाती लुटे, प्रिया राऊत, पुजा भनारकर, भाग्यश्री इंदलकर, कल्याणी खडतकर अशी गुन्हा दाखल झालेल्या सेल्सगर्लची नावे आहेत. या चोरी प्रकरणाची पोलिसांनी माहिती दिली असून त्यात म्हटले आहे की, शंतनु दिपक चिमुरकर (२८, रा. नागमोडी ले आऊट, रेशीमबाग) यांचे इतवारी सराफा मार्केटमध्ये चिमुरकर ब्रदर्स नावाने ज्वेलर्सचे दुकान आहे. त्यात ही चोरी करण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे.
चिमुरकर यांनी दिलेल्या तक्रारीत सेल्सगर्लने २०१९ ते २०२३ दरम्यान त्यांच्या दुकानातून ७४ लाख २५ हजाराचे सोन्या चांदीचे दागिने चोरुन नेले. खरं तर सोन्या चांदीच्या दुकानात रोज किती स्टॅाक शिल्लक आहे. त्याची रोज मोजदाद होत असते. त्यातून काही चोरीला गेले तर लगेलच लक्षातही येते. पण, चार वर्षात ही गोष्ट कळाली नाही. यामागे नेमकं काय घडलं याचा आता पोलिसांच्या तपासात शोध लागेल. तूर्त तरी या सेल्सगर्ल विरुध्द गुन्हा दाखल झाल्यामुळे सऱाफ व्यावसायिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.