चाळीसगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तरुण तरुणींना अश्लील चाळ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या चाळीसगाव शहरातील U.S.Cafe या अनधिकृत कॅफेची भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी तोडफोड केली. मंगळवारी पोलिसांनी कारवाई केली असता तेथे आ. चव्हाण यांनी भेट दिली व तेथे असलेले अनधिकृत डार्क रूम उदध्वस्त केले.
या कारवाईबाबत आ. मंगश चव्हाण म्हणाले, यापूर्वी देखील सदर कॅफेच्या बाबतीत तक्रारी आल्या असत्या तेथे मी पुढाकार घेऊन कारवाई केली होती. येथे कुठल्याही प्रकारचे चहा, नाश्ता पदार्थ किंवा साहित्य आढळून आले नाही. तसेच अश्लील चाळ्यांसाठी एक डार्क रूम तिथे तयार केली होती. एकूणच तरुण पिढीला चुकीच्या कृत्यांसाठी प्रोत्साहन याठिकाणी मिळत होते.
चाळीसगाव शहरात असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. नगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर हा अनधिकृत कॅफे सुरू होता, त्याकडे जर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असेल तर संबंधित नगरपालिका अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचा सूचना यावेळी दिल्या. सदर ठिकाणी ६ मुलं आणि ६ मुली आढळून आल्या होत्या. खरंतर मुलगी ही कोणाच्याही घरची असेना तिच्या इभ्रतीची काळजी घेणे, तिचा सन्मान करणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला शिकवण आहे. त्याच्यामुळे सदर मुलींची नावे पुढे न करता त्यांच्या पुढील शैक्षणिक किंवा दुसरं काही नुकसान व्हायला नको त्याची खबरदारी म्हणून घेण्याचा तसेच मुलांना प्रिव्हेन्शन म्हणून पोलीस प्रशासनास कारवाई करण्याचा सूचना दिल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले माझी नागरिकांना विनंती असेल, चाळीसगाव शहरामध्ये वा परिसरामध्ये असे चुकीचे प्रकार आपल्या लक्षात येत असतील त्यांनी ते माझ्या निदर्शनास आणून द्यावे. लोकप्रतिनिधी म्हणून राजकारणाच्या पलीकडे जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या मीही पार खंबीर आहे. पालकांना माझी एकच विनंती असेल आपला मुलगा, मुलगी काय करताहेत याची जरा व्यवस्थित माहिती ठेवली पाहिजे. मुली पळून जाण्याचा प्रकार वाढले आहेत. रोज अश्या अनेक घटना घडत आहे प्रत्येकच मुलगा आणि मुलगी अशी असते असं नाही पण एक जबाबदार पालक म्हणून आपल्या मुलांना विश्वासात घेऊन त्यांचे कौन्सलिंग केलं पाहिजे. आजचं प्रकरण म्हणजे हे चाळीसगाव शहराला लागलेली कीड आहे. असे प्रकार यापुढे सहन केले जाणार नाहीत, गरज पडली तर अश्या अनधिकृत बांधकामांवर जेसीबी चालवला जाईल.