इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ह्या माणसानी ह्या देशाचे वाटोळे केले… टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही अशी टीका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर सोशल मीडियातून गुरुवारी केली होती. त्या टीकेला आता अण्णा हजारे यांनी उत्तर देऊन अब्रनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे संकेत दिले आहे. आम्ही वकिलाचा सल्ला घेऊ व योग्य तो निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले.
या टीकेला उत्तर देतांना अण्णा हजारे चांगलेच भडकले. ते म्हणाले की, माझ्या काही आंदोलनामुळे यांच्या कार्यकर्त्याचं वाटोळं झालं हे नाकारता येत नाही. बरेच कार्यकर्ते घरी गेले ना, हे त्यांचं नुकसान झालं. ते त्यांना कदाचित सहन होत नसेल. म्हणून काहीतरी कुरापत काढायची, बदनामी करायची. पण काही फरक पडत नाही. माझ्यामुळे देशाचं वाटोळं झालं असं म्हणायचं तर मी एवढे काय कायदे केले त्या कायद्याचा जनतेला फायदा झाला. माहितीचा अधिकार या देशाला मिळाला असेही ते म्हणाले.
या कारणाने होती टीका
अण्णा हजारे यांनी काँग्रेस सत्तेत असतांना आंदोलन केल्यामुळे काँग्रेस सत्तेवरून गेली आणि भारतीय जनता सत्तेवर आली अशी चर्चा नेहमी होत असते तोच संदर्भ घेऊन जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यावर ही टीका केल्याचे बोलले जात आहे. खरं तर अण्णा हजारे भाजप सत्तेत आल्यापासून फारसे बोलत नाही. त्यामुळे भाजप विरोधी आघाडीतील नेते अधून मधून त्यांच्यावर टीका करत असतात. पण, आता जितेंद्र आव्हाड यांनी थेट अण्णा हजारे यांना लक्ष करत दोन ओळीतील बोचरी टीका केली आहे. त्यावर आता अण्णा हजारे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊतने सुध्दा घेतला होता चिमटा
याअगोदर मणिपुरच्या घटनेवर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळेस खा. संजय राऊत यांनी असाच चिमटा काढला होता, त्यावेळेस ते म्हणाले होते की, माझी अण्णांना हात जोडून विनंती आहे हा देश वाचवायचा आहे. तुम्ही देश वाचवायची भूमिका घेतलेली आहे. आज खरी आंदोलनाची गरज आहे. अण्णा हजारे यांनी त्या काळात आंदोलन केल्यामुळे काँग्रेस सत्तेवरून गेली आणि भारतीय जनता सत्तेवर आली. आज त्याच भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारांविरोधी अण्णांनी आवाज उठवावा आणि ही गरज आहे.