नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –ग्राहक संरक्षण कायद्यात ग्राहकांच्या हिताच्यादृष्टीने कालानुरूप बदल करण्यात आले आहेत. ग्राहकांनी आपले हक्क व हित याबाबत माहिती करून घेणे अत्यंत गरजेचे असून ग्राहक संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्राहकांचा प्रत्यक्ष सहभाग महत्वाचा आहे. असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, नाशिक अध्यक्ष मंदाकिनी भोसले यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर जिल्हा ग्राहक पंचायत समितीचे सचिव विलास देवळे, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मनिष सानप, न्यायीक सदस्य प्रेरणा काळोखे, प्र.जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार, वीज न्यायमंचाचे अध्यक्ष मंगेश पिंगळे, पोलीस निरिक्षक नाशिक ग्रामीण सुनिल भाबड यांच्यासह ग्राहक संरक्षण संघटनांचे प्रतिनिधी व ग्राहक उपस्थित होते.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, नाशिक अध्यक्ष मंदाकिनी भोसले म्हणाल्या की, २४ डिसेंबर हा दिवस आपण राष्ट्रीय ग्राहक संरक्षण दिन म्हणून साजरा करतो. यावर्षी ‘Comsumer protection in the era of E-commerce and Digital Trade’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. त्यादृष्टीने ग्राहकांना त्यांच्या हक्क व त्याबाबतचे कायदे याबाबत माहिती होण्यासाठी प्रभावी जनजागृती होणे महत्वाचे आहे. सध्याच्या काळात ग्राहकांचा ऑनलाईन खरेदीकडे वाढता कल दिसून येतो. ऑनलाईन वस्तू खरेदी करतांना माहिती अभावी अनेकदा ग्राहकांची फसवणूक होतांना दिसते. यासाठी ऑनलाईन वस्तूंची खरेदी करतांना ग्राहकांनी कोणती सजगता बाळगावी याबाबत ग्राहक संघटनांनी ग्राहकांचे प्रबोधन करावे यासोबतच झालेल्या फसवणूकीबाबत तक्रार करतांना कोणती कागदपत्रे आवश्यक असावी याचेही मागदर्शन ग्राहकांना करावे. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी कुरियर कपंन्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाचे सहकार्य महत्वपूर्ण असेल, असेही जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, नाशिक अध्यक्ष मंदाकिनी भोसले यांनी यावेळी सांगितले.
न्यायीक सदस्य प्रेरणा काळोखे ग्राहक संरक्षण कायद्याबाबत माहिती देतांना म्हणाल्या, १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आला. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर ग्राहक संरक्षण परिषद ही केंद्रीय, राज्य व जिल्हा या तीन स्तरावर स्थापन करण्यात आली आहे. ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व संवर्धन करून ग्राहकांचे प्रबोधन करणे, ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम ग्राहक सरंक्षण परिषद करीत आहे. ग्राहकांमध्ये कायद्याची अधिक जागरूकता होण्यासाठी ग्राहक संरक्षण परिषद तसेच ग्राहक संघटना यांनी प्रत्येक महिन्यांत शिबीरे आयोजित करून ग्राहकांचे प्रबोधन केल्यास राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्व अधिक अधोरेखित होईल, असा विश्वास न्यायीक सदस्य प्रेरणा काळोखे यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन व त्याचे महत्व याबाबतची माहिती उपस्थितांना विषद केली. यावेळी जिल्हा ग्राहक पंचायत समितीचे सचिव विलास देवळे व वीज न्यायमंचाचे अध्यक्ष मंगेश पिंगळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.