मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कागदपत्रांची मुदत संपलेल्या टाटा कंपनीचे मो/ डंपर बनावट इंजिन व चेसीस नंबर पंचिंग करुन, बनावट कागदपत्रांच्या सहायाने परिवहन कार्यालयात नोंदणी करुन, पुन्हा विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला मुंबई गुन्हे शाखा कक्ष – ४ कडून अटक करण्यात आली आहे.
जोगेश्वरी, मुंबई येथून ताब्यात घेण्यात आलेल्या २ आरोपींनी अरुणाचल प्रदेश येथील परिवहन कार्यालयाची बनावट कागदपत्राद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या डंपरची एन.ओ.सी. प्राप्त करुन, त्या आधारे वसई विरार परिवहन कार्यालयात डंपरची नोंदणी करुन, वसई विरार परिवहन कार्यालयाचे नोंदणीचा नवीन क्रमांक मिळवुन, १२ ते १५ लाख रुपयांना सदर डंपर गरजवंताना विकून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे तसेच शासनाची फसवणुक केली असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले आहे.
मोटर डंपर बनावट पासिंग करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या आरोपीस राउरकेला, ओडिसा या ठिकाणावरून अटक करण्यात आली असून बनावट चेसिस नंबर मोटर डंपरच्या चेसीस वर प्रिंट करणाऱ्या आरोपीस त्याचे प्रिंटिंग साठी वापरण्यात येणाऱ्या मशीनसह हैदराबाद, तेलंगणा या ठिकाणावरून अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत अंदाजे १ कोटी २० लाख किंमतीचे १० डंपर तपासात जप्त करण्यात आले असून अजून तपास सुरू आहे.