इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः शिरूर लोकसभा मतदारसंघातील खा. डॉ. अमोल कोल्हे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आव्हान दिले आणि आज ते खा. कोल्हे यांच्या मतदारसंघात दाखल झाले. खा. कोल्हे यांच्या पराभवाचा विडा अजित पवार यांनी उचलल्यानंतर खा. कोल्हे शरद पवार यांच्या भेटीला मोदीबागेत पोहचले आहेत.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी बु. येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मांजरी नळ पाणी पुरवठा योजना, रेल्वेफाटकावरील उड्डाणपुल, मुळा मुठा नदी वरील पुलांच्या विविध विकास कामांची पाहणी अजित पवार यांनी केली. यावेळी आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता वैशाली आवटे, डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.
यामुळे चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात असणाऱ्या खा. कोल्हे यांना अजित पवार यांनी काल आव्हान दिले आणि आज ते लगेच ॲक्शन मोडवर आले. कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार देऊन त्याला मोठया मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार अजितदादांनी केला. त्यानंतर शिरूर मतदारसंघातील हडपसर परिसरातील विविध विकासकामांची त्यांनी पाहणी केली.
त्यामुळे मी आलो
अजितदादांना कालचे आव्हान आणि आजचा दौरा याबाबत विचारता त्यांनी या दोन गोष्टींचा परस्परांशी काहीही संबंध नाही, असे स्पष्ट केले. आ. तुपे यांनी अधिवेशनादरम्यान कामाची पाहणी करण्यास बोलावले होते. त्यामुळे मी आलो. ‘त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका उत्तम बजावली; पण शिरूरमध्ये त्यांना आम्ही पर्याय देणार आहोत. त्यांच्या विरोधातला उमेदवार निवडूनच आणणार, असे ते म्हणाले होते. कोल्हे यांच्यासमोर त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांचे आव्हान असेल.
कामे लवकरात लवकर पूर्ण करावे
मांजरी बु. परिसरातील पाण्याची समस्या लक्षात घेता मांजरी नळ पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावी. योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे पूर्ण झालेल्या ठिकाणी महानगरपालिकेने तात्काळ नळ जोडणीची कार्यवाही सुरू करावी. आगामी काळातील लोकसंख्या विचारात घेता रेल्वे क्रॉसिंगच्या बाजूला एक अतिरिक्त पाईपलाईन करावी. महानगरपालिकेने या योजनेचे उर्वरीत कामे लवकरात लवकर पूर्ण करुन या भागातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवावी.