इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कर्नाटकमधील मंगळुरुमधील श्रीनिवास गौडा याने सॅाप्टवेअर कंपनीतील नोकरी सोडून गाढव पाळून ५ दिवसात १७ लाखाची कमाई केली. त्याने नोकरी सोडल्यानंतर चक्क डॅाकी फार्मच उभारला. त्यामुळे सुरुवातीला त्याच्या या निर्णयाची सर्वांनी त्याची चेष्ठा केली. पण, तो निर्णयावर ठाम राहिला व त्याने चक्क गाढव पाळून करोडपती होण्याच्या दिशेने आपले पाऊल टाकले.
गौडा याने २०२२ मध्ये आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडली. त्यानंतर त्याने डॅाकी फार्म सुरु केले. येथे त्याने गाढव पाळले. त्यातून त्याने गाढविणीचं दूध विकायला सुरुवात केली. प्रती लिटर दहा हजारापर्यंत असणारे हे दूध जगातील सर्वात महागडे आहे. भारतात या दूधाची मागणी कमी असली तरी इतर देशात मोठ्या प्रमाणात आहे.
फक्त दूधच नाही तर या दुधापासून बनवलेले चीजही महागड्या दरात विकले जाते. गाढविणीच्या दुधात अनेक पौष्टिक तत्व असल्यामुळे त्याला जास्त मागणी आहे. या दुधाचा सौंदर्य उद्योगातही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे या दुधाला मागणी आहे. त्यामुळे गौडा यांचा हा निर्णय अभ्यासपूर्ण घेतलेला आहे. तो गाढवपणा नक्कीच नाही. एखादी चांगल्या प्रकाराची नोकरी सोडून दुसरी वाट धरणे इतके सोपे नाही. पण, श्रीनिवासने ते केले व त्याला त्याचा फायदाही झाला.
श्रीनिवास गौडा म्हणतात भारतातील आणि कर्नाटकातील हे पहिले गाढव पालन आणि प्रशिक्षण केंद्र आहे. सध्या आमच्याकडे २० गाढव असून सुमारे ४२ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. गाढवाचे दूध सर्वांना मिळावे, हे आमचे स्वप्न आहे. गाढवाचे दूध हे औषधी सूत्र असल्याचेही त्याने सांगितले.
गाढवांना सुस्थितीत ठेवण्याकरिता विशेष श्रम पडत नाहीत अगर खर्चही फार येत नाही. चरबट व थोड्या अन्नावर ती तग धरून काम करू शकतात. बऱ्याच काळपर्यंत ती पाण्याशिवायही राहू शकतात. त्यामुळे कमी खर्चात मोठे उत्पन्न देणारा डॅाकी फार्म त्यामुळे चर्चेत आला.