बंगळूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कर्नाटकचे मंत्री शिवानंद पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले असून, त्यावर भाजपने पलटवार केला आहे. शिवानंद पाटील यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा अपमान केल्याचे भाजपचे म्हणणे आहे.
राज्यात पुन्हा पुन्हा दुष्काळ पडावा, जेणेकरून त्यांचे कर्ज माफ व्हावे, अशी शेतकऱ्यांची इच्छा असल्याचे ते म्हणाले. भाजपने हे विधान शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे म्हटले असून मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा मागावा असे आवाहन केले आहे. मंत्री शिवानंद पाटील यांनी सप्टेंबरमध्ये एक वादग्रस्त विधान केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते, की मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईची रक्कम दोन लाखांवरून पाच लाख रुपये केल्यानंतर शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे.
बेळगाव येथील एका कार्यक्रमात पाटील म्हणाले, की कृष्णा नदीचे पाणी फुकट आहे, नालाही फुकट आहे. मुख्यमंत्र्यांनी बियाणे आणि खतेही दिली आहेत. शेतकऱ्यांना एकच गोष्ट आवडेल, की वारंवार दुष्काळ पडावा कारण त्यांची कर्जे माफ केली जातील. शेतकऱ्यांनी अशी इच्छा करू नये, शेतकऱ्यांची इच्छा नसली तरी तीन-चार वर्षांतून एकदा दुष्काळ पडेल. ते म्हणाले की, राज्य दुष्काळाशी झगडत आहे, हे पाहता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मध्यम मुदतीच्या कर्जावरील व्याज माफ करण्याची घोषणा केली आहे.
जेव्हा शेतकरी संकटात सापडतो, तेव्हा सरकार त्यांच्या मदतीला धावून येते; पण कोणत्याही सरकारला तसे करणे नेहमीच अवघड असते. देशाला पोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात मंत्र्यांचे वक्तव्य बेजबाबदार असल्याचे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनी काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला. देशाचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांविरुद्ध काँग्रेस आणि त्यांच्या सरकारची ही वृत्ती दुर्दैवी आहे, असे म्हणत त्यांनी निषेध केला. भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांनी पाटील यांच्यावर अशी विधाने करून शेतकरी आणि कृषी संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप करत एक मिनिटही मंत्रिपदावर राहण्यास ते योग्य नसल्याचे सांगितले.