नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उत्तर रेल्वेमध्ये नियुक्त केलेल्या लिपिकाचा राष्ट्रीय तपास संस्था शोध घेत आहे. त्याच्यावर ‘इसिस’च्या दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर रेल्वेमध्ये नियुक्त केलेल्या लिपिकाने रेल्वेमध्ये अनेक बनावट वैद्यकीय बिले सादर केली. त्यातून त्याने पैसे जमा केले आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत केली.
या संदर्भात रेल्वे विभागाने दिल्ली पोलिसांच्या संसद पोलिस ठाण्यात बनावट वैद्यकीय बिलातून पैसे काढताना फसवणुकीची तक्रारही दाखल केली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ‘एनआयएक’डून पाच लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या वाँटेड दहशतवादी शाहनवाजसह ‘इसिस’च्या तीन इसिस दहशतवाद्यांना अटक केली, तेव्हा लिपिकाचे दहशतवादी कनेक्शन उघड झाले. त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली. ‘एनआयए’ने दहशतवाद्यांच्या चौकशीदरम्यान अनेक गुपिते उघड केली आहेत.
लिपिकाच्या अटकेनंतर ‘इसिस’च्या पुणे-महाराष्ट्र मॉड्यूलमध्ये आणखी मोठे खुलासे होऊ शकतात. या वर्षी २ ऑक्टोबर रोजी, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एक मोठे यश मिळवले आणि ‘इसिस’ च्या दहशतवाद्यांना अटक केली, त्यापैकी एक मोहम्मद शाहनवाज होता. तो ‘एनआयए’च्या मोस्ट वॉन्टेड यादीत समाविष्ट होता. परदेशातील हँडलर्सकडून सूचना घेऊन हे तिघे उत्तर भारतात दहशतवादी घटना घडवण्याचा कट रचत होते, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले होते. एनआयएने शाहनवाजवर तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अशातच पुणे पोलिसांनी शाहनवाजला अटक केली. शाहनवाज हा दिल्लीचा रहिवासी असून पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्याचे सांगण्यात आले. अटक होण्यापूर्वी तो दिल्लीत लपून बसला होता. शाहनवाज अभियंता आहे. १७-१८ जुलैच्या मध्यरात्री पुणे पोलिसांनी त्याला पकडले. तो पुण्यातील कोथरूड परिसरात मोटारसायकल चोरण्याचा प्रयत्न करत होता.