संगमनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नगर जिल्ह्यात आजी-माजी महसूलमंत्र्यांतील कलह राज्याला माहिती आहे. दोघांचे मतदारसंघ शेजारी शेजारी आहेत. आपल्या मतदारसंघाची बांधणी करताना शेजारच्याला डिस्टर्ब करण्याचे काम हे दोन्ही नेते करीत असतात. विखे यांचे संगमनेर तालुक्यात दौरे वाढले आहेत. थोरात विरोधकांना बळ देण्याचे काम ते करीत असतात. अशाच एका समारंभात विखे यांनी केलेली राजकीय फलंदाडी चांगलीच चर्चेत आहे.
घारगावमध्ये नामदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या परितोषिक वितरणाला विखे म्हणाले, की संगमनेर तालुक्याला एका चांगल्या फलंदाजाची आवश्यकता आहे. समोरून चेंडू कसेही आले, तरी ते सीमापार करता आले पाहिजेत. फिल्डिंग कशी लावायची ते माझ्यावर सोडा.कधी कोणाची दांडी कशी गूल करायची, हे मला चांगलेच माहीत आहे.
या स्पर्धेत त्यांनी केलेले तडाखेबाज भाषण विरोधकांची विकेट घेणारे होते. स्पर्धेचे औचित्य पाहून विखे-पाटील यांनी राजकीय फलंदाजी केली. त्याला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. विखे यांनी टाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांना राजकीय सल्ला देताना ते म्हणाले, की आता एकच कोणता तरी संघ निश्चित करा. आयपीएलसारखे संघ बदलू नका. भविष्य घडविण्यासाठी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे सांगत त्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचे आवाहन केले.