नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘वतन को जानो’ कार्यक्रमाला सहभागी झालेल्या जम्मू आणि काश्मीरमधील तरुणांच्या शिष्टमंडळाने आज (25 डिसेंबर 2023) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.युवकांना आपल्या देशाची कला, संस्कृती, सभ्यता आणि देशात होत असलेल्या विकास कार्याची माहिती करून देणे हा ‘वतन को जानो’ कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे शिष्टमंडळातील सदस्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या. आपण वेगवेगळ्या भाषा बोलतो, वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करतो, वेगवेगळी जीवनशैली अंगीकारतो, असे असले तरीही आपण एक आहोत, हे या दौऱ्यात युवकांच्या लक्षात आलेच असेल. हीच एकता आपली खरी ताकद आहे, असे त्या म्हणाल्या.
कलम 370 हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या विकासात अभूतपूर्व प्रगती झाली आहे, हे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. भारत सरकार आणि स्थानिक प्रशासन लोकांच्या प्रगतीसाठी एकत्र काम करत आहेत. डिजिटल जम्मू आणि काश्मीरच्या दिशेने वाटचाल करत, प्रशासनला भविष्यासाठी सज्ज करण्यासाठी शासन प्रणालीने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे, असे त्या म्हणाल्या. प्रभावी वितरण आणि पारदर्शकता हा सुशासनाचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमधील तरुणांना भारताच्या मुख्य प्रवाहाचा भाग बनून त्यांची स्वप्ने पूर्ण करायची आहेत. पण आजही काही घटकांना निहित स्वार्थामुळे काश्मीरची प्रगती व्हावी असे वाटत नाही, असे त्यांनी सांगितले.
सरकारकडून होत असलेल्या विकासात्मक प्रयत्नांचा लाभ घेण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी युवा शिष्टमंडळातील सदस्यांना केले. यामुळे युवकांच्या आयुष्यात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील, असे त्या म्हणाल्या. आपल्या उज्वल भविष्यासाठी अंमली पदार्थ, समाजकंटक आणि नकारात्मक प्रचारापासून दूर राहण्याचा सल्ला राष्ट्रपतींनी या युवकांना दिला. लोकशाही सर्वांना न्याय्य संधी प्रदान करते, युवकांनी फक्त लोकशाहीवर विश्वास ठेवला पाहिजे तसेच समर्पण आणि कठोर परिश्रम घेऊन प्रगती केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.