पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– अटल संस्कृती गौरव पुरस्काराच्या माध्यमातून देशाला गौरव वाटेल अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात आला असून या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार आणि शब्द कायम स्मरणात राहतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
श्री.फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना २०२२ साठी आणि उद्योजक डॉ.प्रमोद चौधरी यांना २०२३ साठी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या अटल संस्कृती गौरव पुस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार प्रकाश जावडेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर, पद्मभूषण डॉ.शां.ब. मुजुमदार, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
अटलजींच्या नावाचा पुरस्कार मिळविणारे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व कार्यक्रमात उपस्थित असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी आपल्या ध्येयनिष्ठेमुळे आपल्याला परिचीत आहेत. देशाची अणूसंपन्नता स्थापित करण्यासाठी कुठल्याही दबावासमोर न झुकता त्यांनी अणुस्फोटाची अनुमती दिली. शक्तिशाली राष्ट्र शांतता प्रस्थापित करू शकतात या विचाराने त्यांनी अणुस्फोट घडवून आणला. त्यानंतर अनेक देशांनी लादलेल्या प्रतिबंधाना न जुमानता त्यांनी जगाला आपल्यासमोर झुकविण्याचे कार्य केले. त्यांच्या स्वभावातील हीच दृढता त्यांच्या काव्यातूनही प्रकट होते.
स्व.अटलजींनी देशाला एका सूत्रात जोडण्याचे कार्य केले
अटलजींनी अर्थकारणाची चांगली जाण होती. ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना देण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू केली. त्यांनी खऱ्या अर्थाने नवभारताची सुरुवात केली. सुवर्ण चतुष्कोणच्या माध्यमातून देशाला एका सूत्रात जोडण्याचे कार्य त्यांनी केले. निराशेतून बाहेर पडण्यासाठी संघर्षाने पुढची वाटचाल कशी करावी याची प्रेरणा त्यांच्या शब्दातून मिळते.
प्रभाताईंच्या स्वरात नादब्रह्माची अनुभूती
काही व्यक्तिमत्त्व इतकी मोठी असतात की त्यांचं वर्णन करण्यासाठी शब्दही अपुरे पडतात, असे नमूद करून श्री.फडणवीस म्हणाले, प्रभाताईंनी संगीताची सेवा करताना भारतीय शास्त्रीय संगीत जनमानसात रुजविण्याचे आणि नव्या गायक-गायिकांना घडविण्याचे कार्य केले आहे. सृष्टीतल्या लय आणि नादाची अनुभूती सामान्य माणसाला करून देणारा प्रभाताईंचा स्वर आहे. त्यांच्या ‘एनलाईटनिंग द लिसनर्स’ या पुस्तकाचं प्रकाशन स्व.अटलजींनीच केलं होतं. केवळ गायनातूनच नव्हे, तर लेखनातूनही त्यांनी संगीत सर्वांपर्यंत पोहोचवलं. त्यांना पुरस्कार दिल्याने पुरस्काराची उंची वाढली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या कार्याचा गौरव केला.
डॉ.चौधरी महाराष्ट्राचे सुपूत्र असल्याचा अभिमान
स्व. अटलजींनी इथेनॉलचे महत्व सर्वप्रथम ओळखले आणि सर्वप्रथम भारताचे इथेनॉल, बायोफ्युएल धोरण तयार केले. या धोरणाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्याचे काम डॉ. प्रमोद चौधरी यांच्या प्राज उद्योगाने केले. त्याचा देशाला मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. महाराष्ट्रातील साखर कारखाने आज इथेनॉल तयार करत आहेत. त्याचे तंत्रज्ञान तयार करण्याचं काम त्यांनी केलं. आज इथेनॉल करणाऱ्या अनेक संस्था पुढे येत आहेत, त्यांचा आधार डॉ.चौधरी यांचे कार्य आहे. ते महाराष्ट्राचे सुपूत्र असल्याचा अभिमान वाटतो, असे कौतुगोद्गार श्री.फडणवीस यांनी काढले.
मंत्री श्री.पाटील म्हणाले, प्रभाताईंच्या तरुणपणीच्या शास्त्रीय संगीत गातांनाच्या भावमुद्रा आजही चेहऱ्यावर दिसतात, ही त्यांच्या साधनेची शक्ती आहे. डॉ. चौधरी यांच्या कार्यामुळे इंधन आयातीवर खर्च होणारे परकीय चलन मोठ्या प्रमाणात वाचले आहे. या दोघांचे कार्य महान आहे, अशा शब्दात त्यांनी दोन्ही पुरस्कार प्राप्त व्यक्तीमत्वांच्या कार्याचा गौरव केला.
ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे म्हणाल्या, प्रकृती ठीक नसतांनाही वाजपेयींजींचा आशिर्वाद पाठीशी असावा म्हणून पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहता आले. त्यांच्यासारख्या कवीमनाच्या, राष्ट्रप्रेमी अधिकारी पुरुषाच्या नावामुळे पुरस्काराची उंची वाढली आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी डॉ.चौधरी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वदेशी इंधन असल्याने त्याला प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे त्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हा चांगला योग आहे, असे ते म्हणाले.
श्री.मोहोळ यांनी प्रास्ताविकात अटल संस्कृती गौरव पुरस्कारामागची संकल्पना मांडली. स्व. अटलबिहारी वाजपेयी आणि पुण्याचे वेगळे नाते होते. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांच्या नावाने पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. अटलजींचा ज्या क्षेत्रात वावर होता त्या क्षेत्रातील व्यक्तींना या निमित्ताने सन्मानित करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमापूर्वी श्री.फडणवीस यांनी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘अटलपर्व’ प्रदर्शनास भेट दिली. कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनील कांबळे, भीमराव तापकीर, पद्मश्री मनोज जोशी, अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी, धीरज घाटे, राजेश पांडे, हेमंत रासने आदी उपस्थित होते.