इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध आस्थापनांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आज मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या मुख्यालयात प्रथमच ‘पेन्शन अदालत’ चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या विविध आस्थापनांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भातील प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागांतून संबंधित प्रशासकीय अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन ए ते टी विभागातील प्रशासकीय अधिकारी, के.इ.एम. राजावाडी, लोकमान्य टिळक रुग्णालय सायन, नायर रुग्णालय, कूपर रुग्णालय येथील प्रशासकीय अधिकारी, उपशिक्षणाधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या अदालतीत ३५० पेक्षा जास्त निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडचणी पालकमंत्री श्री. लोढा यांनी समजून घेतल्या व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पेन्शन वितरण संदर्भातील प्रशासकीय अडचणींवर तत्काळ तोडगा काढला. या पेन्शन अदालतमध्ये १२९ कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात सहभाग घेतला तसेच २५० तक्रारी ऑनलाईन माध्यमातून प्राप्त झाल्या होत्या. आज उपस्थित कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के कर्मचाऱ्यांचे पेन्शन ऑनलाईन माध्यमातून वितरित करण्यात आले. येत्या १५ दिवसांत या सर्व लोकांना त्यांचे पेन्शन प्राप्त होईल याची व्यवस्था करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. लोढा यांनी दिले. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भातील अडचणी सोडवण्याचे आणि पुढील ३० ते ६० दिवसात सर्वांचे पेन्शन वितरित करावे, असेही निर्देश पालकमंत्री श्री. लोढा यांनी दिले.
पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले की, “महानगरपालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पेन्शन मिळावे म्हणून पेन्शन अदालत सुरु करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून मुंबईतील किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातील प्रथम पेन्शन अदालत मुंबई महानगरपालिकेत आयोजित करण्यात आली. या पेन्शन अदालतच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भातील समस्या कोणताही वेळ न दवडता सोडवण्याचा प्रयत्न आहे.
पेन्शन अदालत ६ ऑक्टोबर २०२३ रोजी देखील आयोजित करण्यात आली असून सकाळी १० वाजता या सभेची सुरुवात होईल आणि सायंकाळी ५ वाजता सभेचा समारोप होईल.