नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड तालूक्यातील शेलू गावातील शेतक-यांनी ज्यांनी केली शेतमालाची निर्यात बंदी त्यांनाच मतदानबंदी असा फलक लावत आपला संताप व्यक्त केला. याअगोदर राज्यभरातील शेतक-यांनी कांदा निर्यात बंदी विरोधात सर्वत्र वेगवेगळे आंदोलन केले. आता गावातून सुध्दा लक्षवेधी आंदोलन करण्यात येत आहे.
केंद्र सरकारने वारंवार हस्तक्षेप करत कांदा निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याचे भाव घसरल्यामुळे हा फलक लावण्यात आल्याचे येथील गावक-यांनी सांगितले. ज्यांनी केली शेतमालाची निर्यात बंदी त्यांनाच मतदानबंदी, जय जवान जय किसान, ज्यांनी केली वारंवार शेतमालाची निर्यात बंदी त्यांना नकोच सत्तेची संधी अशा आशयाचे फलक लावले आहे. या फलकाच्या माध्यमातून शेतक-यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
कांदा निर्यात बंदीचा निर्णय रद्द करावा यासाठी याअगोदर एका शेतक-याने फुकट कांदा वाटला, तर काही गावांमध्ये विकास रथ अडवण्यात आला. एकीकडे रस्त्यावरील आंदोलन सुरु असतांना आता गावातही वेगवेगळे आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधण्यात येत आहे.