नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी इंदूर येथे आज दुपारी १२ वाजता होणार असलेल्या ‘मजदुरों का हित मजदुरों को समर्पित’ या कार्यक्रमात दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. यावेळी ते इंदुरमधल्या हुकुमचंद गिरणी कामगारांच्या थकबाकीशी संबंधित सुमारे २२४ कोटी रुपयांचा धनादेश अधिकृत अवसायक आणि कामगार संघटनेच्या प्रमुखांना सुपूर्द करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान हुकुमचंद गिरणी कामगारांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांचीही पूर्तता केली जाणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.
इंदूरमधील हुकुमचंद मिल १९९२ मध्ये बंद झाली होती आणि त्यानंतर अवसायनात गेली. तेव्हापासून हुकुमचंद मिलचे कामगार आपली थकबाकी परत मिळवण्यासाठी प्रदीर्घ कायदेशीर लढा देत आले आहेत. अलीकडेच मध्य प्रदेश सरकारनं या प्रकरणासंदर्भात सकारात्मक पुढाकार घेत, देण्यांची रक्कम आणि मागण्यांसदर्भात सर्वमान्य होईल अशा तोडग्यावर यशस्वी वाटाघाटी केल्या होत्या.
या तोडग्याला न्यायालयं, कामगार संघटना तसंच गिरणी कामगारांसह सर्व भागधारकांचीही मान्यता मिळाली. या तोडग्याअंतर्गत मध्य प्रदेश सरकारनं सर्व थकबाकी आगाऊ स्वरुपात अदा करणे, गिरणीची जमीन ताब्यात घेणे आणि या जमीनीचा निवासी आणि व्यावसायिक वापरासाठी विकास करणे अशा उपाययोजनांचा समावेश आहे.