नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दहशतवादी दाऊदच्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता याच्याबरोबर पॅरोलवर असताना पार्टी करणे सलगी ठेवणे आणि डान्स करणे असे आरोप ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजरवर भाजपचे आमदार नितेश राणे व पालकमंत्री भुसे यांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी सुरु असतांना ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला असून त्यामुळे चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.
खा. राऊत यांनी सांगितले की, मुंबई बॉम्ब स्फोटातला आरोपी सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर हे ज्या पार्टीमध्ये एकत्र दिसले, ती पार्टी भाजपाचे माथाडी संघटनेचे नाशिक महानगर प्रमुख व्यंकटेश मोरे यांनी आयोजित केली होती. मोरे यांनीच या पार्टीत बडगुजर यांना आमंत्रित केले होते असा दावाही राऊत यांनी केला. यावेळी राऊत यांनी मोरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र दिसत असलेले छायाचित्रंही दाखवले.
यावेळी खा.राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा व्हिडिओ मकाऊचा व्हिडिओ बडगुजर यांच्या कुटुंबियांना दिल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई केल्याचा आरोपही केला. ते म्हणाले की हा व्हिडिओ मला बडगुजर यांच्या कुटुंबियांनी दिला नाही. मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो असेही ते म्हणाले. हा व्हिडिओ कोणी दिला हे नागपूरच्या लोकांना माहित असल्याचेही ते म्हणाले.
बडगुजर यांनी याअगोरच केले होते आरोपाचे खंडण
याअगोदर सलीम कुत्ता बरोबर माझा कधीही संबध नव्हता राजकीय हेतून आरोप केले आहेत. माहिती घेऊन आरोप केलेले नाही. माझे संबध अगोदर नव्हते..आताही नाही. सार्वजनिक जीवनामध्ये एखादया ठिकाणी भेट झाली असेल त्याची मला माहित नाही असे सांगत उध्दव ठाकरे गटाचे नाशिक शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी विधानसभेत त्यांच्यावर केलेल्या आरोपाचे खंडण केले होते.