अमळनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे १० चिमुरड्यांची प्रकृती बिघडली आहे. अमळनेर तालुक्यातील गांधली येथे हा दुर्दैवी प्रकार घडला. विषबाधा झालेल्या सर्व चिमुरड्यांवर अमळनेर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे.
तालुक्यातील गांधली येथील १० मुलांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा झाली. त्यात 6 मुली व 4 मुलं आहेत. सर्व मुलांना पुढील उपचारासाठी मुलांना ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे दाखल करण्यात आले आहे. सर्व मुलांचे वय हे 10 वर्षाखालील आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या फेसबुक पेजवरूनही दिली आहे. दरम्यान, एका मुलाला धुळे येथे रवाना करण्यात आले असल्याचेही कळते.
अमळनेर तालुक्यात मुलांनी चंद्रजोत झाडाच्या बिया खाल्याने विषबाधा झाल्याच्या घटनेवर पालकमंत्री गुलाबराव पाटील हे लक्ष ठेवून आहेत, मुलांच्या उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. मुलांची प्रकृती स्थिर असली तरीही सावधानतेचा अतिरिक्त उपाय म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथील बालरोगतज्ज्ञ यांचे पथक अमळनेर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.