नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड-मनमाड रोडवर वाहन अडवून लुटमार करणारे दरोडेखोरांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या गुन्हयात फिर्यादीनेच कट रचल्याचे समोर आले आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १७ डिसेंबर रोजी मध्यरात्रीचे सुमारास चांदवड ते मनमाड जाणारे रोडवर फिर्यादी आमीर उर्फ शोएब सैय्यद व साक्षीदार सर्फराज ताडे हे पिकअप वाहन घेऊन मनमाडच्या दिशेने जात असतांना म्हसोबा मंदीर परिसरात दोन मोटर सायकलवर आलेल्या अज्ञात आरोपीतांनी फिर्यादीचे पिकअप वाहन अडवून फिर्यादी व साक्षीदार यांना चाकूचा धाक दाखवून त्यांचेकडील रोख रक्कम अडीच लाख रूपये व दोन मोबाईल फोन असा एकूण २ लाख ५४ हजार रूपयेचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेल्याबाबत चांदवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांनी या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व चांदवड पोलीसांना वरील गुन्हा उघडकीस आणणेसाठी सुचना दिल्या होत्या. त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सदर गुन्हयातील फिर्यादी याने आरोपींचे सांगितलेले वर्णन, तसेच घटनेच्या हकिकतीप्रमाणे तांत्रिक बाबींची पडताळणी केली. त्यानंतर गोपनीय बातमीच्या आधारे यातील गुन्हेगार हे मनमाड शहरातीलच असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मालेगाव नाका परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार इंजमाम उर्फ भैय्या सलीम सैय्यद, वय २४, रा. ५२ नंबर, जमदाडे चौक, मनमाड, व उजेर आसिफ शेख, वय २२, रा. भगतसिंग मैदान, दत्तमंदिर रोड, मनमाड यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचेकडे वरील गुन्हयाचे तपासात चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे साथीदार मोईन इब्राहिम सैय्यद, ओम शिरसाठ, हर्षद बि-हाडे, सर्व रा. मनमाड यांचेसह मिळून सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे.
यातील ताब्यात घेतलेले आरोपी इंजमाम उर्फ भैय्या सैय्यद व उजेर शेख यांचेकडे वरील गुन्हयाचे तपासात अधिक चौकशी केली असता, त्यांनी सदर गुन्हयातील फिर्यादी पिकअप चालक आमीर उर्फ शोएब जब्बार सैय्यद, वय २३, रा. आय. यु.डी.पी., भवानी चौक, मनमाड याचे सांगणेवरून कट रचून चांदवड ते मनमाड रोडवर म्हसोबा मंदीर परिसरात पिकअप वाहन अडवून चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व मोबाईल फोन बळजबरीने चोरून नेले असल्याचे तपासात समोर आले आहे.
या आरोपींच्या कब्जातून वरील गुन्हयात जबरीने चोरून नेलेली रोख रक्कम २ लाख ४८ हजार ७०० रूपये हस्तगत करण्यात आली आहे. यातील फिर्यादी आमीर उर्फ शोएब सैय्यद याचे व गाडी मालक सर्फराज फारूक ताडे, रा. मनमाड या दोघांमध्ये यापुर्वी पैशांचे देवाण-घेवाणीवरून वाद होते. या कारणावरून फिर्यादी आमीर उर्फ शोएब सैय्यद यानेच कट रचून त्याचे वरील साथीदारांसह सदर गुन्हा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सदर गुन्हयात ताब्यात घेतलेले आरोपी इंजमाम उर्फ भैय्या सलीम सैय्यद व उजेर आसिफ शेख यांचेवर मनमाड पोलीस ठाणेस खून व खूनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. सदर आरोपी व फिर्यादी आमीर उर्फ शोएब सैय्यद यांना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांची पाच दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. सदर गुन्हयातील इतर आरोपीचा पोलीस पथक कसोशिने शोध घेत असून चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि सुरेश चौधरी, पोहवा अमोल जाधव यांचे पथक पुढील तपास करीत आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि गणेश शिंदे, पोउनि नाना शिरोळे, पोहवा नवनाथ सानप, पोना विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, विशाल आव्हाड यांचे पथकाने वरील गुन्हेगारांना ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सदर गुन्हयातील तपास पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दहा हजार रूपयांचे बक्षीस जाहीर करून तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.