नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विविधतेने नटलेल्या आपल्या देशात साधारण प्रती शंभर किलोमीटरवर भाषा, खाद्य पदार्थ, कला आणि संस्कृतीत बदल जानवतो. नाशिकमध्ये खान्देश भागातील बहुसंख्य लोक राहतात त्यांच्या या संस्कृतीचे दर्शन इतरांना घडावे यासाठी आमदार सीमा हिरे यांनी आयोजित केलेला खान्देश महोत्सव अतिशय कौतुकास्पद असून त्यांनी तो नियमित सुरू ठेवावा असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून नाशिककरांचा खान्देश महोत्सव २०२३ हा सोहळा नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास उपस्थित राहून मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित बांधवांशी संवाद साधला. यावेळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ, आमदार सीमा हिरे, सौ.रश्मी हिरे, महेश हिरे, राज हिरे, माजी नगरसेवक राजेंद्र महाले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, संत मुक्ताबाई, साने गुरुजी, बहिणाबाई, बालकवी, ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे, केकी मूस, ना. धो. महानोर, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासारखे महान व्यक्तिमत्व देणाऱ्या खान्देशला अतिशय संपन्न आणि वैभवशाली संस्कृती लाभली आहे. या संस्कृतीचा अभ्यास व्हावा तेथील संस्कृतीचे दर्शन घडावे यासाठी, आमदार सीमा हिरे यांच्यावतीने आयोजित करण्यात येत असलेला खान्देश महोत्सव हा अतिशय कौतुकास्पद आहे. या सांस्कृतिक महोत्सवातून नाशिकमधील खान्देशवासियांना खान्देशच्या अद्वितीय संस्कृतीचे विविध पैलू अनुभवता येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, या महोत्सवामध्ये विविध शासकीय विभाग, निमशासकीय विभाग यांचे कृषी, पर्यटन, पुरातत्व आदी माहितीपर स्टॉल्स, खान्देशमधील किल्ले, लेण्या, ऐतिहासिक ठिकाणे, धार्मिक ठिकाणे, पर्यटन स्थळे याबाबतची सविस्तर माहिती या प्रदर्शनातून देण्यात आली असल्याने खान्देश संस्कृती आणि परंपरेची ओळख या माध्यमातून होत आहे. खान्देश संस्कृतीची ओळख करून देत असतांना साहित्य, लोककला, क्रीडा क्षेत्रासाठी महत्वाच व्यासपीठ निर्माण झालं असल्याचे त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले की, प्रत्येक विभागाची अभिमानास्पद संस्कृती आणि परंपरा आहे. आपल्याकडे खान्देश परिसरातही अनेक पिढ्यांनी योगदान देत खान्देशची संस्कृती जतन केली आहे. मूळ खान्देशनिवासी असणाऱ्या मात्र शिक्षण किंवा रोजगाराच्या संधींसाठी नाशिक परिसरात स्थलांतर केलेल्या नवीन पिढ्यांची नाळ या संस्कृतीशी जोडलेली रहावी. या संस्कृतीमधील उज्ज्वल परंपरांचे दर्शन नव्या पिढीला घडावे. खान्देशाशी नाते सांगणाऱ्या माणसाच्या कलागुणांसह त्याच्या कौशल्यांना ताकदीचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हा महोत्सव अतिशय महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.