लखनऊ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समाजवादी पक्षात सुरू असलेला कौटुंबिक वाद पक्षाने मिटवला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाचा मोठा राजकीय विजय म्हणून याकडे पाहिले जात आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पुन्हा एकदा समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले आहे.
पक्षश्रेष्ठींच्या संमतीने त्यांच्याकडे पुन्हा एकदा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. म्हणजेच पक्ष २०२४ ची लोकसभा निवडणूक यादव यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आहे. ते तिसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडून आले आहेत. पक्षावर नाराज असलेले शिवपाल यादव आणि राम गोपाल यादव या काकांनी पक्षाला पाठिंबा देण्यासाठी हात पुढे केले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी नाराजांची मनधरणी करण्यात समाजवादी पक्षाला यश आले आहे.
उत्तर प्रदेशच्या राजकारणात समाजवादी पक्षाचा दबदबा आहे. उत्तर प्रदेशात तीन वेळा पक्षाने सत्ता मिळवली होती; मात्र समाजवादी पक्षाने केवळ एकदाच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात आपला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी अखिलेश यादव एकामागून एक राजकीय खेळी करत असले तरी त्यांच्या कौटुंबिक वादाचा प्रश्न नेहमीच चर्चेत असे. पण, तो त्यांनी मिटवल्यामुळे आता यादव कुटुंबिय एकसंघ पुढील निवडणुकीला सामोरे जातील..