इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हिंदी महासागरात सुमारे २०० नॉटिकल मैल दूर असलेल्या पोरबंदर किनारपट्टीवर एका व्यापारी जहाजावर संशयास्पद ड्रोन हल्ला झाला. याबाबत अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दावा केला आहे, की ज्या रासायनिक टँकरवर ड्रोन हल्ला करण्यात आला, तो इराणमधून सोडण्यात आला होता.
पेंटागॉनच्या निवेदनात म्हटले आहे, की २०२१ पासून व्यावसायिक जहाजावर इराणचा हा सातवा हल्ला आहे. ही घटना भारताजवळ घडली. इस्रायल-हमास संघर्षा दरम्यान इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील जहाजांवर हल्ले तीव्र केले असताना ही घटना घडली आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसून टँकरमधील आग शमवण्यात आली आहे.
‘युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स’ ने या घटनेची माहिती दिल्यानंतर नौदलाचे पी-८ आय सागरी गस्ती विमान जहाज आणि त्याच्या क्रूच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. एमव्ही केम प्लुटो हे जहाज आणि त्यातील कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. भारतीय नौदलाने व्यापारी जहाजाच्या मदतीसाठी एक आघाडीची युद्धनौका पाठवली, तर भारतीय तटरक्षक दलानेही कारवाई केली. हे जहाज सौदी अरेबियातील बंदरातून कच्चे तेल घेऊन मंगळूर बंदरात जात होते, असे सांगण्यात आले.