इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः तीन राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसने संघटनेत मोठे बदल केले आहेत. त्यात महाराष्ट्रा्तील तीन नेत्यांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. खर्गे यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि प्रभारींची नवी टीम तयार केली असून, त्यात १२ सरचिटणीस आणि १२ प्रदेश प्रभारींची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे या फेरबदलात प्रियांका गांधी यांचे सरचिटणीसपद कायम ठेवण्यात आले असले, तरी त्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. जबाबदारीच्या ओझ्यातून त्या मुक्त झाल्या आहेत. महाराष्ट्रातील मिलिंद देवरा, मुकल वासनिक आणि अविनाश पांडे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. प्रियांका यांच्या जागी अविनाश पांडे यांच्याकडे राज्याची धुरा सोपवण्यात आली आहे.
विधानसभेच्या २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत दारूण पराभवानंतर प्रियंका गांधी तिथे अजिबात सक्रिय दिसल्या नाहीत. उत्तर प्रदेशात यूपीमध्ये काँग्रेससाठी सध्या काही विशेष उरले नाही, हे त्यांना समजले आहे. पक्षाच्या सततच्या खराब कामगिरीमुळे प्रतिमा डागाळण्याची भीती प्रियांकाला वाटते आहे. ते टाळण्यासाठी त्यांनी जबाबदारी पांडे यांच्याकडे देण्यास परवानगी दिली. काँग्रेसच्या या फेरबदलात सचिन पायलट यांना बढती मिळाली आहे. पायलट यांना सरचिटणीस बनवण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्याकडे छतीसगडची जबाबदारी देण्यात आली आहे. बिहारमध्ये मोहन प्रकाश यांच्याकडे पक्षाला राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दलासमोर उभे करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.