कोपरगावा (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथापुढे कांदे ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. त्यानंतर या रथाला परत पाठण्यात आले. कांदा निर्याद बंदी नंतर राज्यभर शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातही याअगोदर रथाला अडवण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतर आता कोपरगाव तालुक्यात केंद्र सरकारचे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी या गावातील शेतक-यांनी सांगितले की, मोदी सरकारचे धोरण शेतकरी विरोधी त्यामुळे संकल्प रथाला गावात प्रवेश करू दिला नाही. उद्योगपती तुपाशी शेतकरी उपाशी, केंद्र शासनाचे धोरण शेतकऱ्यांचे मरण अशा घोषणा या वेळी शेतकऱ्यांनी दिल्या. विशेष म्हणजे या आंदलोनात भाजपच्या पदाधिका-यांनी सहभाग घेतला.
काही दिवसापूर्वी चांदवड तालुक्यातील उर्धुळ येथेही असाच रथ अडवण्यात आला होता. त्यावेळी शेतक-यांनी आपला संताप व्यक्त केला होता.
गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्यात बंदीवरुन राज्यभर शेतक-यांमध्ये प्रचंड संताप आहे. या प्रश्नावरुन जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने झाली. निर्यात बंदीची घोषणा केल्यानंतर कांद्याचे भावही कोसळले. त्यामुळे शेतक-यांमध्ये हा रोष असून त्याचे पडसाद ठिकठिकाणी उमटत आहे.