नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– तीन राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसल्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे काँग्रेसचा स्थापना दिन २८ डिसेंबरला नागपूरला साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सोनिया, प्रियंका, राहुल हे गांधी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे. पण, या कार्यक्रमात दहा लाखाची गर्दी जमवण्याचे मोठे आव्हान स्थानिक काँग्रेस समोर आहे.
विदर्भाचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांना बँक घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. त्याअगोदर तीन राज्यांतील निवडणुकीत अपयश आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कमी झाला आहे. कार्यकर्त्यांत चैतन्य राहिले नाही. नेतेही धास्तावले आहेत. अशा परिस्थितीत दहा लाख लोकांची गर्दी जमा करण्याचे दिलेले उद्दिष्ट कसे साध्य करायचे, याची चिंता महाराष्ट्रातील नेत्यांना लागली आहे.
दिघोरी नाका, उमरेड रोड येथील ८० एकरांच्या मैदानावर काँग्रेसची ही सभा होणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपविरोधात ही सभा विक्रमी असेल, असा दावा केला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या मुलाचे २५ तारखेला लग्न आहे. ते त्यातच व्यस्त आहेत. त्यात त्यांच्या मतदारसंघात सभा नसल्याने ते उत्साही नाहीत. त्यामुळे आता ही गर्दी कशी जमवली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.