नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -आयुष्याचा प्रत्येक क्षण परोपकार लोकशिक्षणासाठी कसा जास्तीतजास्त खर्च करता येईल याचा सतत ध्यास श्री.संत जनार्दन स्वामी यांनी घेतला होता. त्यांनी श्री शिव पंचायतन यज्ञ याग,भव्य जपअनुष्ठान करून समाज जागृती केली. त्यांचं हे कार्य आता श्री स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी त्यांच्या कार्याचा ध्यास घेऊन गुरूंचे कार्य राज्यात नव्हे देशात नव्हेतर जगात पोहचवीण्याचे कार्य ते करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
जगद्गुरु श्री जनार्दन स्वामी यांच्या ३४ व्या पुण्यतिथी निमित्त कुंभमेळा मैदान नाशिक येथे महंत श्री शांतीगिरी महाराज यांच्याकडून जपानुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी प.पू स्वामी साविदानंद सरस्वती महाराज, पपू परमानंदगिरी महाराज उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, संपूर्ण विश्वाने ,विश्वासाने आणि आदराने नतमस्तक व्हावे अशी अतिशय दिव्य संस्कृती भारतात आहे. भारतीय संस्कृतीचा संत आणि दैवी पुरूषांशी अनादी काळापासून संबंध आला आहे. महाराष्ट्रालाही संतांची फार मोठी परंपरा लाभली आहे. त्यात एक नाव म्हणजे निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचं आहे. निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांनी सर्व सामान्य लोकांना अध्यात्म परमार्थ शिकवला, सोप्या भाषेत विशेष म्हणजे ग्रामीण भाषेत वेदांताचा अर्थ सांगितला. दिशाहीन समाजाला दिशा दाखविली.
ते म्हणाले की, श्री. संत जनार्दन स्वामी यांनी लहान मुलांना गुरुकुल पध्दतिचे शिक्षण, पडीत नापीक जमिनींची भाविकांकडून श्रमदानाद्वारे जमिनीचे लेवल, सपाटीकरण करून फुलांच्या फळ्यांच्या बागा फुलविल्या. हजारो शिवमंदिराचे भूमिपूजन केले,गावोगावी,खेडोपाडी ,शहरी विभागात भक्त समवेत जावून प्रवचना द्वारे शिवभक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. कोणत्याही धर्माचा पंथाचा भेद केला नाही. संपूर्ण भारततीर्थ यात्रा केली. आश्रमात भाविकांसाठी, विद्यार्थी, वारकरी, साधू , संत, अनाथ यांच्यासाठी मोठ मोठ्या इमारती व वसतिगृह निर्माण केले व स्वत:साध्या झोपडीत राहून जनता जनार्दनाची सेवा केली. सामुदायीक जप ,तप,अनुष्ठान ,यज्ञ ,पारायण , भजन आणि भोजन असा आग्रह असणाऱ्या स्वामीजींनी जनसामान्यांना अपार आनंदाचा आणि मौलिक मुल्यांचा सुलभतेणे लाभ करून दिला असल्याचे सांगितले. तसेच सद्गुरू श्री स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्याकडून धार्मिक अध्यात्मिक समाज घडविण्याचे अलौकिक कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.