इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्यात आली होती ही पिटीशन आता सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून यामुळे मला विश्वास आहे की, सर्वोच्च न्यायालय लवकरात लवकर सुनावणी करेल. याच क्युरेटिव्ह पिटीशनच्या माध्यमातून मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल असं मराठा आरक्षणाची याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितलं.
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापिठाने ५ मे २०१९ रोजी मराठा आरक्षण रद्दबातल केले होते. याच मराठा आरक्षण रद्दबातल करण्याच्या निर्णयाचे पुनर्लोकन व्हावे अशी मागणी करणाऱ्या राज्य सरकार व इतर क्युरीटीव्ह पिटीशन वर सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापिठा पुढे सहा डिसेंबर रोजी सुनावणी झाली.
या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश डॉ.धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती न्यायमूर्ती एहसानुद्दीन अमानुल्लाह या पाच सदस्य घटना पिठापुढे सरन्यायाधीशांच्या दालनामध्ये राज्य सरकार, विनोद पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी झाली.
२४ जानेवारीला निकाल
माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी मराठा आरक्षणा संदर्भात क्युरिटीव्ह पिटीशन स्विकारलेली आहे. येत्या २४ जानेवारीला या संदर्भात निकाल देण्यात येईल असे आज न्यायालयाने स्पष्ट केले. बारा वाजून तेवीस मिनिटाला याबाबत माननिय न्यायमूर्तींनी सही करून त्या संदर्भात आदेश दिलेला आहे. मला विश्वास आहे, मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार..
विनोद पाटील, याचिकाकर्ते