पाटणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केजरीवाल पाठोपाठ इंडिया आघाडीतील बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी’ने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. यादव यांना अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले आहे. त्यांना पुढील वर्षी पाच जानेवारीला कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
यापूर्वी त्यांना २२ डिसेंबरला बोलावण्यात आले होते; पण तेजस्वी चौकशीसाठी आले नाहीत. त्यांचे वडील लालू यादव यांनाही अंमलबजावणी संचालनालयाने २७ डिसेंबरला समन्स बजावले आहे. शनिवारी अंमलबजावणी संचालनालय, नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणाचा तपास करणाऱ्या एजन्सीने यादव यांना नवीन समन्स जारी केले. २००४ ते २००९ दरम्यान जमिनी घेऊन रेल्वेत अनेकांना नोकऱ्या दिल्याप्रकरणी तपास यंत्रणा उपमुख्यमंत्र्यांची चौकशी करणार आहे. लालू प्रसाद यादव केंद्रातील मनमोहन सिंग सरकारमध्ये रेल्वेमंत्री असताना ही घटना घडली. लालू यादव यांनी नियम आणि कायदे बाजूला ठेवून अनेकांना रेल्वेच्या ग्रुप डी मध्ये नोकऱ्या दिल्या आणि त्या बदल्यात कुटुंबातील सदस्यांच्या नावावर जमीन आणि इतर मालमत्ता घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात लालू यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी, तेजस्वी यादव, लालू यादव यांची मुलगी मीसा भारती यांच्यासह अनेक कुटुंबीय आरोपी आहेत. या सर्वांची अनेकवेळा चौकशी केली आहे. सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय या प्रसिद्ध घोटाळ्याची चौकशी करत आहेत. याप्रकरणी तेजस्वी यादव म्हणाले, की हे सर्व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुद्दाम केले जात आहे. यापूर्वीही चौकशीत काहीही निष्पन्न झाले नव्हते. यावेळीही काही होणार नाही.