नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक, उद्योगपती अशोक कटारीया यांच्यावर लावण्यात आलेले बदनामीकारक आरोपा बाबत त्याच्या लिगल टीमचे अॅड. संजय राकावत यांनी पत्रकार परिषद घेत कटारीया यांची कायदेशीर बाजू सांगितली. यावेळी आरोप करणारे नितिन सुगंधी यांचे विरुध्द १०० कोटी रक्कमेचा अब्रुनुकासानीचा दावा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, नाशिक यांच्या न्यायालयात दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. याचबरोबर न्यायालयाने नितिन सुगंधी यांना अशोक कटारिया यांचे विरुध्द कुठल्याही प्रकारचा बदनामीकारक मजकूर वृत्तपत्रांत अथवा इलेक्ट्रॉनीक सामाजिक माध्यमांद्वारे व अन्य प्रकारे प्रसिध्द करण्यांस मनाई केलेली असल्याची माहिती त्यांनी दिली.
२५ नोव्हेंबर रोजी नितिन सुगंधी यांनी पत्रकार परिषद घेऊन कटारिया यांचे विरुध्द शेतकरी म्हणून पुरावा नसतांना सिन्नर तालुक्यात शेतजमीन विकत घेतल्याचा आरोप केला. त्याचप्रमाणे तहसिलदार, सिन्नर यांनी २०२२ मध्ये अशोक कटारिया यांचे मालकीच्या शेतजमिनी सरकार जमा करण्याचे आरोप लावले. अशोक कटारिया यांची या आरोपांमुळे जाहीर बदनामी झाली. त्याबाबत विविध वृतपत्रांमध्ये व विविध इलेक्ट्रॉनीक माध्यमांमध्ये कटारिया यांचे विरुध्द बदनामीकारक मजकूर प्रसिध्द करण्यात आला. त्यामुळे अशोक कटारिया यांची अपरीमित बदनामी करण्यांत आल्याचेही पत्रकार परिषदेत राकावत यांनी सांगितले.
यावेळी तहसिलदार, सिन्नर यांनी ३१ मे २०२३ रोजी पारीत केलेला आदेशाला उच्च न्यायालय, मुंबई यांनी जुन २०२३ रोजी स्थगिती दिलेली आहे. याची माहिती असतांना सुध्दा नितिन सुगधी व अन्य संबंधीत व्यक्तींनी वैयक्तीक आकांसांपोटी व विपरीत हेतूने जाणीवपूर्वक कटारिया यांची बदनामी केली आहे. कटारीया यांनी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करुन व योग्य ते पुरावे सादर करुन अशोक कटारिया यांनी सुमारे ३४ वर्षांपूर्वी सिन्नर तालुक्यातील जमिन विकत घेतलेली आहे. त्यांचा उत्कर्ष सहन न होवून व केवळ त्यांना मनस्ताप व्हावा म्हणून त्यांचे बदनामीचे कुटील कारस्थान रचण्यांत आल्याचेही यावेळी अॅड. संजय राकावत यांनी सांगितले.