बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये सभा घेऊन सरकारला थेट इशारा दिला. यावेळी त्यांनी पुढील आंदोलनाची घोषणाही केली. मराठयाचं पुढचं आंदोलन २० जानेवारीला आता मुंबईत आझाद मैदानावर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आमरण उपोषण करणार असल्याचे ते म्हणाले.
२० जानेवारीला मुंबईला कसे जायचे याबाबत त्यांनी सांगितले अल्टिमेटम ठेवू नका, अशी सरकारने केलेली विनंती मनोज जरांगे पाटील यांनी फेटाळून लावत आज ही मोठी घोषणा केली. उद्या हा अल्टिमेटम संपणार आहे. त्यापूर्वी आज जरांगे यांची बीडमध्ये सभेत पुढच्या आंदोलनाची दिशा निश्चित केली.
या सभेत जरांगे पाटील म्हणाले, की सरकार वेळकाढूपणा करत आहे. ते मराठ्यांची फसवणूक करीत आहे. सहनशीलतेच्या, संयमाच्या आणि वाट पाहण्याच्या काही मर्यादा आहेत. आता आपली मयार्दा संपली आहे. किती दिवस दम काढायचा. आता फक्त लढायचे नाही, तर जिंकण्यासाठी लढायचे आहे. ट्रॅक्टरधारकांना नोटिसा देऊन तुम्ही ट्रॅक्टर दाबू शकता; परंतु मराठ्यांना नाही. आतापर्यंत खूप झाले. आंदोलनात जाळपोळ करू नका, जो जाळपोळ करेल तो आपला नाही, असे त्यांनी ठणकावले. जे आमदार आणि खासदार मराठा आंदोलनासाठी साथ देणार नाहीत, त्यांना यापुढे दारातही उभे करू नका, असा गर्भित इशारा जरांगे पाटलांनी दिला. मी मॅनेज होत नाही, हाच यांचा प्रॉब्लेम आहे. मी जिवंत असेपर्यंत मराठा आरक्षण समाजाला मिळवून देणारच, असा आत्मविश्वास व्यक्त करताना मराठा समाज आणि आपले नाते माय-लेकाचे आहे, असे ते म्हणाले. या सभेत त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीक केली. येवल्याचा येडपट म्हणून त्यांचा उल्लेख केला.
ठिकठिकाणी जोरदार पुष्पवृष्टी
बीड शहरात जरांगे यांची आज निर्णायक इशारा सभा झाली. या सभेतून जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढची दिशा जाहीर केली. या सभेला बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेसाठी जरांगे शुक्रवारी रात्रीच मांजरसुंबा येथे मुक्कामी होते. बीडमध्ये सभेपूर्वी मोठी रॅली काढण्यात आली. ती जवळपास तीन तास चालली. त्यानंतर ही एल्गार सभा झाली. जरांगे सभास्थळी व रॅलीत जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली.
मुंबईकडे मोर्चा वळवला
राज्य सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी मुंबईत विधिमंडळाचे खास अधिवेशन बोलवले आहे. हे अधिवेशन फेब्रुवारीत होणार आहे; परंतु त्यापूर्वीच वीस जानेवारीपासून उपोषण करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. या अगोदर दोन वेळा जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे उपोषण केले होते. आता त्यांनी जालन्याऐवजी मुंबईकडे मोर्चा वळवला आहे आणि उपोषणाच्या वेळी राज्यभरातील कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यांचे तिसरे उपोषण निकराचे असणार आहे.