नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महावितरणच्या ठाणे येथील भरारी पथकाने शहरातील वीज चोरी रोखण्यासाठी छापे मारे सुरू केली असून, गोविंदनगर भागात वीज कंपनीचे तब्बल सात लाख रूपयांचे नुकसान करण्यात आल्याचे समोर आले आहे. सदनिकाधारकाने वीज मिटरमध्ये फेरफार करून साडेपाच वर्षापासून ही वीज चोरी केली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाऊलाल पंवय (५५ रा.तळमजला बी विंग,स्वाती श्री अपा.गोविंदनगर) असे वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरेश भवर यांनी फिर्याद दाखल केली आहे. गोविंदनगर येथील स्वातीश्री अपार्टमेंटमध्ये वीज चोरी होत असल्याची माहिती महावितरणच्या ठाणे भरारी पथकास मिळाली होती.
त्यानुसार पथकाने शनिवारी (दि.२३) छापा टाकला असता हा प्रकार समोर आला. पवय यांच्या सदनिकेस जोडण्यात आलेल्या वीज मिटरमध्ये फेरफार करण्यात आला होता. पथकाच्या चौकशीत गेल्या साडे पाच वर्षापासून ही चोरी सुरू होती. ६३ महिन्यात तब्बल ३० हजार ६६५ युनिटची चोरी करून संशयिताने महावितरणचे ७ लाख १० हजार ७१० रूपयांचे नुकसान केल्याचे समोर येताच पथकाने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.