इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्ली आणि परिसरात हवेचा दर्जा आणखी खालावल्यामुळे दिल्लीत चारचाकी वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली सरकारने हे आदेश शुक्रवारी काढले आहे. तिसऱ्या टप्प्यातील उपाययोजना काल जारी करण्यात आल्या. दिल्ली आणि एनसीआरमध्ये बांधकाम आणि पाडकामविषयक कामांवरही बंदी घालण्यात आली आहे.
हवेच्या दर्जाबाबत व्यवस्थापन करणाऱ्या आयोगाच्या उपसमितीनं आठ कलमी कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.त्यानुसार,रस्त्यांची साफसफाई यांत्रिक पद्धतीनं करण्याची नियमितता वाढवण्यास सांगण्यात आलं आहे.
रस्त्यावर जमा झालेली धूळ खाली बसण्यासाठी विशिष्ट घटकांबरोबर पाण्याचं सिंचन रोज करायलाही सांगण्यात आलं आहे. सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर वाढण्यासाठी गर्दी नसलेल्या वेळेसाठी सवलतीचे तिकीट दर लागू करण्याचीही सूचना करण्यात आली आहे.