इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडः मराठा आरक्षणासाठी अल्टिमेटम ठेवू नका, अशी सरकारने केलेली विनंती मनोज जरांगे पाटील यांनी फेटाळून लावली आहे. उद्या हा अल्टिमेटम संपणार आहे. त्यापूर्वी आज जरांगे यांची बीडमध्ये सभा होणार असून, त्यात ते काय बोलतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या सभेपूर्वी पुन्हा सरकारचे शिष्टमंडळाने आज जरांगे यांची भेट घेतली. पण, त्यातही काही तोडगा निघाला नाही.
बीड शहरात जरांगे यांची आज निर्णायक इशारा सभा होत आहे. या सभेतून जरांगे पाटील आंदोलनाची दिशा जाहीर करण्याची शक्यता आहे. या सभेला राज्यभरातील मराठा आंदोलक उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी पाच लाख लोक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. जरांगे शुक्रवारी रात्रीच मांजरसुंबा येथे मुक्कामी होते. बीडमध्ये सभेपूर्वी मोठी रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी दीड वाजता एल्गार सभा होणार आहे.
जरांगे सभास्थळी पोहोचताच त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. जरांगे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चारशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. मराठा आरक्षणावरून बीड जिल्ह्यात जाळपोळ आणि दगडफेक झाली होती. जमावाने अनेक राजकीय नेत्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर दगडफेक करत जाळपोळ केली. बीड शहरात आंदोलकांची होणारी गर्दी आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.