माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
पुढील दोन दिवस मुंबई व खान्देशसह मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात ढगाळ वातावरण जाणवण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारतात सध्य:स्थित पश्चिमी झंजावात हा अरबी समुद्रात गुजराथ व मुंबई किनारपट्टीपर्यंतच्या २० डिग्री अक्षवृत्तपर्यंत दक्षिणेकडे सरकला आहे. त्यामुळे उत्तरेकडील थंडावा व थंड वारे गुजराथमार्गे सध्या तेथे पोहोचत आहेत. गेल्या १५ दिवसापासून मध्य महाराष्ट्र, गुजराथ, व मुंबईत सरासरीच्या खाली घटलेले दुपारचे कमाल तापमान आज सरासरीच्या पातळीत पोहोचले आहे. म्हणजे कमाल तापमान आता वाढले आहे. मध्य महाराष्ट्र, गुजराथ, व मुंबईत आज व उद्या फक्त दोन दिवसाकरिता ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे.
सकाळच्या वेळी ईशान्य मान्सून कालावधीत दक्षिणेतील राज्याकडून लोटलेली आर्द्रता, दैनिक उच्चंतम पातळीतील आर्द्रतेत मिसळून अधिकच होते. त्यामुळे हिवाळ्यात सकाळच्या वेळी कमी उंचीवरच ढगांचे मळभ तयार होते. व जसजसा सूर्य किरणे हावी होतात तेंव्हा ढगाळता निवळून पुन्हा सर्वत्र निरभ्रता येते.
अर्थात कधी कधी तर निरभ्रततेसाठी दिवसाचा अधिक कालावधीही वापरला जातो किंवा दिवसही जातो, व दैनिक आर्द्रतेच्या न्यूनतम पातळीनंतर म्हणजे सायंकाळी ४ नंतर निरभ्रतता येते. त्यातलाच सध्याच्या ढगाळ वातावरणाचा प्रकार समजावा.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune.