नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकचे अल्हाददायक वातावरण, निसर्गरम्य वातावरण, येथील संस्कृती हे सगळं मनाला आनंद देणारे आहे. नरेडकोच्यावतीने आयोजित होमेथॉन प्रदर्शनामध्ये विविध स्टॉलला भेट दिल्यानंतर नाशिक किती बदलतय याची प्रचिती आली. हे सर्व प्रकल्प बघितल्यानंतर नाशिकमध्ये घर घ्यायला आवडेल अशी भावना प्रसिध्द अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी व्यक्त केली.
सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे २१ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ असे चार दिवसांचे ‘होमेथॉन प्रदर्शन ‘ नाशिक शहरातील गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे सुरू असून यानिमित्त दि.२३ रोजी सांयकाळच्या सत्रात प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी निर्मिती अॅडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित व निवेदिका किशोरी किणीकर या दोन्ही मुलाखतकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना प्रार्थना यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
याप्रसंगी व्यासपीठावर नरडेको नाशिकचे अध्यक्ष अभय तातेड व वंदना तातेड, होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर व जयश्री ठक्कर, सचिव सुनील गवादे व गीता गवादे, होमेथॉनचे सहसमन्वयक शंतनु देशपांडे व आसावरी देशपांडे,पुरूषोत्तम देशपांडे व सौ.शाल्मली देशपांडे, भूषण महाजन व मृणाल महाजन, श्री व सौ अविनाश शिरोडे, टायटल स्पॉन्सरर दीपक चंदे व दीपा चंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अभिनेत्री प्रार्थना म्हणाल्या की, नरेडकोने होमेथॉनच्या माध्यमातून १५ लाख ते अगदी १२ कोटी रूपयांपर्यंतची घरे उपलब्ध करून दिली आहेत. खरं म्हणजे सगळयांसाठी घर ही संकल्पना घेऊन नरेडकोने आयोजित केलेले हे प्रदर्शन बघून खुप आनंद वाटला. ज्यावेळी मी या प्रदर्शनातील विविध स्टॉल्सला भेटी दिल्या तेव्हा आपण खरचं नाशिकमध्ये आहोत का यावर विश्वासच बसला नाही. नाशिकचा हा विकास पाहून नाशिक पुढील पाच वर्षात मुंबई, पुण्यालाही मागे टाकेल यात शंका नाही. नाशिकचे आणखी एक वैशिष्टै म्हणजे आजही या शहराने संस्कृती, परंपरांची त्यातच इथले हवा, पाणी आणि एकूणच वातावरण अत्यंत प्रसन्न, छान आणि सुंदर आहे. तसेच येथील निसर्गाचे वातावरण अत्यंत अल्हाददायक असल्याने ऑक्सिजन देखील चांगला मिळतो. त्यामुळे मला देखील नाशिकमध्ये घर घेऊन येथे राहायला आवडेल.’या प्रदर्शनाची स्तुती करताना, नरेडकोच्या प्रदर्शनामुळे सर्वसामान्यांना घराचे स्वप्न साकार करता येईल. सर्वांसाठी घर ही नरेडकोची संकल्पना भावल्याचे सांगत या आयोजनाचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले.
घराच्या संकल्पनेविषयी बोलतांना त्या म्हणाल्या की, घर म्हणजे काही नुसत्या चार भिंती नव्हे तर जिथे राहून आपल्याला आनंद मिळतो ते माझं घर, आज नाशिकमध्ये येउन मलाही आनंद झाला खरं म्हणजे नाशिक हे माझ घरच असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमधील गेटेड कम्युनिटी मला खुप भावली. मी मुळची बडोद्याची. करियरसाठी मी मुंबईत आली पण मुंबईमध्ये आपला शेजारी कोण हे देखील एकमेकांना माहित नसते. परंतू नाशिकमध्ये गेटेड कम्युनिटी सारखे प्रकल्प बघून आनंद वाटला. या माध्यमातून एकमेकांशी भावनिक नाते जपले जाते. विशेष म्हणजे सुरक्षा महत्वाची असते. दुसरं म्हणजे लहान मुलांना मित्र मैत्रिणी भेटतात त्यामुळे मित्रांसमवेत एकत्र येण्याचा आनंद अशा गेटेड कम्युनिटीमधून मुलांना मिळतो. या माध्यमातून आपल्या परंपरांची देखील जपल्या जातात असे त्यांनी सांगितले.
नाशिकशी भावनिक नाते
नाशिकमध्ये माझं घर नसले तरी नाशिकशी माझे भावनिक नाते आहे. ५ जानेवारीला माझा वाढदिवस असतो यादिवशी मी त्र्यंबकेश्वर, वणी गडावर सप्तश्रृंगी देवी माता आणि शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या दिवसाची सुरूवात करते त्यामुळे नाशिकशी माझे एक प्रकारे भावनिक नाते असल्याचे त्यांनी सांगितले. इतकच नव्हे तर माझ्या ‘व्हाटसअप लग्न’चित्रपटाचे शुटींगही नाशिकमध्ये झाली. माझं नुकतच लग्न ठरले आहे आणि माझी नाशिकमध्ये शुटींग सुरू असतांना माझे पती मला अचानक नाशिकला भेटायला आहे. त्यामुळे लग्न ठरल्यानंतर माझ्या पतीसोबत मी पहिल्यांना जिथे वेळ घालवला ते नाशिकमध्येच असे सांगत त्यांनी आपल्या नाशिकमधील आठवणींना उजाळा दिला.
नरेडकोने मराठी कलाकारांचा सन्मान केला
खंर म्हणजे आजकाल कोणत्याही कार्यक्रमासाठी हिंदी कलाकारांना प्राधान्य दिले जाते. परंतू नरेडकोने एका मराठी कलाकाराला ‘ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’ म्हणून सन्मान दिला ही खरोखर कौतुकास्पद बाब असून याबददल मी नरेडकोचे खुप खुप आभार मानते. विशेष म्हणजे या प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर हे गुजराती भाषिक. ते जेव्हा आपल्या परिवाराशी गुजरातीत बोलत होते तेव्हा मला आपली माणसं भेटल्यासारखी वाटल्याचे सांगितले. येथे एका मराठी आणि गुजराथी व्यक्तीचे जॉईंट व्हेंचर आहे हे बघून महाराष्ट्र -गुजरातचे नाते किती घटट आहे हे बघायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
यश टिकवणे अवघड
सगळयांना आपण खुप मोठे व्हावे असे वाटत असते परंतू आज तुम्ही कोणत्याही क्षेत्रात स्ट्रगल केल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे तुम्हाला जिथे पोहचायचे आहे तिथे पोहचण्यासाठी संयम असणे फार आवश्यक असते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मिळालेले यश टिकवून ठेवणे हे देखील खूप महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रारंभी त्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देऊन तेथील गृहप्रकल्पांची माहिती घेतली. प्रारंभी प्रार्थना बेहरे यांचा पैठणी देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रास्ताविकात जयेश ठक्कर आणि सुनील गवादे यांनी नरेडकोची तसेच होमेथॉन प्रदर्शनाची माहिती दिली. यावेळी प्रार्थना बेहरेच्या हस्ते घर खरेदी करणार्या ग्राहकांना चांदीचे नाणे भेट देऊन सत्कार करण्यात आला.होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर,सह समन्वयक शंतनू देशपांडे,भूषण महाजन सचिव सुनील गवादे यांच्यासह भाविक ठक्कर ,प्रशांत पाटील,पुरुषोतम देशपांडे,राजेंद्र बागड,अश्विन आव्हाड,अविनाश शिरोडे,,शशांक देशपांडे,नितिन सोनवणे,मयूर कपाटे,भूषण कोठावदे, हर्षल धांडे,अभय नेरकर आदी प्रयत्नशील आहेत.
दुसर्या दिवशी ६९ फ्लॅटचे बुकिंग
प्रदर्शनाच्या दुसर्या दिवशी सुमारे १४ हजार नागरिकांनी भेट दिली. तर ६९ नागरिकांनी फ्लॅट, शॉप, प्लॉटचे बुकिंग केले. दोन दिवसांत २४ हजार नागरिकांनी भेट दिली असून ९९ लोकांनी आपल्या घराचे स्वप्न साकार केले. या सर्व ग्राहकांना नरेडकोच्यावतीने चांदीचे नाणे भेट देण्यात आले.