नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाहन खरेदी विक्रीत एकाची बारा लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्जाची परतफेड विमा आणि वाहन नावे करून दिले नाही म्हणून हा प्रकार पोलिसात पोहचला असून याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चार जणांविरूध्द फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजर युनूस मनियार (३२) तोहफिक युनूस पठाण (४५ रा.दोघे ओझर ता.निफाड), जहिर इब्राहिम शेख (३५ रा.भद्रकाली) व जावेद हसन सय्यद (४० रा.काझीगडी सिन्नर) अशी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत कृष्णा वरगणे (रा.सांगवी जि.जालना) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
वरगणे यांनी गेल्या १८ जुलै रोजी संशयितांशी टाटा मोटर्स वाहनाचा खरेदी विक्रीचा व्यवहार केला होता. यावेळी वाहनावरील फायनान्स निल करून विमा आणि पासिंगपोटी संशयितांना ११ लाख ८० हजार रूपयांची रक्कम अदा करण्यात आली होती. मात्र संशयितांनी पाच महिने उलटूनही वाहनाचा कर्ज व्यवहार पूर्ण केला नाही तसेच विमा काढून वाहनही नावे करून दिले नाही त्यामुळे वरगणे यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक छाया देवरे करीत आहेत.