नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सलग पाच दिवस सिडकोत दोन लहान मुलांना वेगवेगळी आमिष दाखवत ६० वर्षीय वृध्दाने त्यांना विविध ठिकाणी घेऊन जात लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. वृध्दाचा अतिरेक वाढल्याने मुलांनी आपबिती कुटूंबियाकडे कथन केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून, याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अनैसर्गिक कृत्यासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कैलास पुंजू पाटील (रा.गणेश चौक सिडको) असे मुलांचा लैंगिक छळ करणा-या संशयित वृध्दाचे नाव आहे. पिडीत मुलांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते गेल्या गुरूवारी (दि.१४) अंगणात खेळत असतांना त्यांना वेगवेगळी आमिष दाखवत वृध्दाने त्याच्या सोबत नेले. परिसरातील ठाकरे सभागृह भागात घेवून जात त्यांच्याशी लैंगिक चाळे केले.
त्यानंतरही भाटीया मंडप डेकोरेटर दुकान आणि राणेनगर येथील स्वामी विवेकानंद पुतळा भागात घेवून जात मुलांचा लैंगिक छळ केला. सलग पाच दिवस हा प्रकार घडल्याने अखेर मुलांनी आपबिती आपल्या कुटूंबियांकडे कथन केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कावळे करीत आहेत.