नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीरोडवरील पुणे विद्यार्थी गृहातपरिक्षेसाठी आलेल्या नगर जिल्ह्यातील विद्यार्थ्याची बॅग एकाने परिक्षास्थळावरून लांबविल्याची घटना घडली. या बॅगमध्ये दोन मोबाईल व घड्याळ व सोन्याचे अलंकार असा सुमारे २४ हजाराचा ऐवज होता. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी परिक्षास्थळावरील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यास जेरबंद केले आहे.
अजय नवनाथ चारोस्कर (२३ रा.चांदोरी ता.निफाड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. याबाबत विशाल वसंत गिते (२९ रा.सोनूशी ता. संगमनेर जि.अ.नगर) या विद्यार्थ्याने तक्रार दाखल केली आहे. गिते मंगळवारी (दि.१९) परिक्षेसाठी शहरात आला होता. पुणे विद्यार्थी गृह या परिक्षास्थळावर त्याने अंगावरील दागिणे, घड्याळ व दोन मोबाईल असा सुमारे २३ हजार ८०० रूपये किमतीचा ऐवज काढून आपल्या सॅगमध्ये ठेवला होता.
परिक्षेस जाण्यापूर्वी त्याने अन्य परिक्षार्थीनी ठेवलेल्या बँगजवळ आपली सॅग ठेवली असता ही घटना घडली. पेपर देवून बाहेर आल्यानंतर त्यास आपली बॅग आढळून आली नाही. ही बॅब त्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून संशयितास हुडकून काढले असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.